दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर शिवसैनीकांचा शिवसेना भवनात दणदणीत निर्धार मेळावा

कोणीही पक्ष सोडणार नाही. एखाद्या पराभवाने शिवसैनिक खचून जाणारे नाहीत. पुन्हा जोमाने कामाला लागून संघटना पुन्हा मजबूत स्थितीत उभारुन दापोली विधानसभा मतदारसंघातील या पुढील प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवूनच दाखवू, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेना भवन, मुंबई येथील आयोजित निर्धाळ मेळाव्यात व्यक्त केला.

दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यातील मुंबईवासीय निष्ठावंत शिवसैनिकांचा निर्धाळ मेळावा शनिवारी 18 जानेवारी 2025 रोजी पार पडला. या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख संजय कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत झालेला हा पराभव काही अंतिम पराभव नाही. पैसा आणि ईव्हीएम छेडछाड याचा तो पराभव आहे. धनशक्तीला शिवसेना या चार नावाच्या शब्दाने प्रतिकुल परिस्थितीही अखेरपर्यंत झुंजवले. हे फक्त शिवसेनाच करू शकते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचाराधारा घेऊन पुढे मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विचारच देश हितासह राज्याची प्रगती करू शकतात, याची केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर विरोधी पक्षातील सर्वानाच खात्री आहे. ही बाब लक्षात घेता शिवसेने शिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभव हा काही आपला तसेच आपल्या शिवसेनेचा अंतिम पराभव नाही. हे ही दिवस निघून जातील पुढील सर्व दिवस हे शिवसेनेचे अर्थातच शिवसैनिकांचेच आहेत. त्यामुळे झाला पराभव विसरून पुन्हा सर्वानी झटून काम करुन शिवसेनेला उभारी आणून चांगले दिवस आणुयात, अशा प्रकारचा निर्धार संजय कदम यांनी व्यक्त केला.

शिवसेना भवन दादर येथे पार पडलेल्या या दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना निर्धार मेळाव्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम, दापोली विधानसभा संपर्कप्रमुख सचिन पाटील, खेड गुहागर तालुका संपर्क संघटक ज्योती भोसले, दापोली मंडणगड तालुका संपर्क संघटीका स्नेहल महाडीक, दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, सहसंपर्कप्रमुख सुहास खोकरे, दापोली तालुका संपर्कप्रमुख रविंद्र धाडवे, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, मंडणगड तालुका संपर्कप्रमुख महेश गणवे, मंडणगड तालुका संघटक विनायक चोरगे आदि मान्यवरांसह दापोली विधानसभा मध्यवर्ती मुंबई कार्यकारिणीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.