मुंबईकरांनो सावध व्हा! पावसासोबत आले डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लू!

मुंबईत जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाळी आजारांनीही चांगलेच डोके वर काढले असून मुंबईला डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लूचा अक्षरशः विळखा पडला आहे. जुलैच्या दोन आठवडय़ांत मुंबईत डेंग्यूचे 166, मलेरियाचे 282 तर स्वाइन फ्लूचे 53 रुग्ण आढळले आहेत. तर गॅस्ट्रोनेही चांगलेच हातपाय पसरले असून तब्बल 694 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. या पार्श्वभूमीवर मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्याने साथीचे आजारही पसरायला सुरुवात झाली आहे. डेंग्यू, मलेरियाला नियंत्रणासाठी पालिकेकडून लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम मराठी, हिंदी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांना सहभागी करून राबवली जाणार आहे. यामध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा संदेश सेलिब्रिटींकडून व्हिडीओच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

लेप्टो रोखण्यासाठी केला 2 लाख 39 हजार उंदरांचा खात्मा; दोन आठवडय़ांत 13,255 उंदीर मारले
प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे जीवघेणे आजार रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलली असून हे आजार पसरवण्यास कारणीभूत ठरणाऱया 2 लाख 39 हजार 527 उंदरांचा खात्मा जानेवारीपासून 14 जुलैपर्यंत केला आहे. तर गेल्या दोन आठवडय़ांत तब्बल 13 हजार 255 उंदीर पालिकेने मारले आहेत. पावसाळय़ात रस्त्यावर पाणी साचून राहिल्यास उंदरांच्या माध्यमातून लेप्टो, प्लेग पसरत असल्याने ‘मूषक नियंत्रण’ मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर उंदरांचा प्रादुर्भाव आढळणाऱया ठिकाणी विषारी गोळय़ा टाकून, रात्रपाळी उंदीरनाशक मोहीम राबवण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांच्या आलेल्या तक्रारींनुसार पालिकेकडून कार्यवाही करण्यात येत आहे. उंदरांचा प्रजनन-दर, त्यांच्यामुळे संभाव्य रोग प्रसार आणि उंदरांमुळे होणारी नासधूस थांबावी यासाठी ‘मूषक नियंत्रण’ उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. एक उंदीर मारण्यासाठी 20 ते 25 रुपयांचा खर्च केला जात आहे. उंदरांपासून होणाऱया आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ राखावा, उंदीर वाढणार यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

तीन हजार बेड तैनात
पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात एकूण तीन हजार बेड तैनात ठेवण्यात आले आहेत. यामध्ये उपनगरीय रुग्णालयात विशेष 500 बेडही तैनात आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात येत आहे. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर धुम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे.

असा होतो प्रसार
उंदीर-घुशींमुळे होणाऱ्या रोगांमध्ये प्लेग व लेप्टोस्पायरोसिस या रोगांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘झिनॉपसिला चिओपिस’ या पिसवा उंदीर-घुशींच्या केसात आढळतात. या पिसवांमार्फत प्लेगची लागण होते. तर लेप्टोस्पायरोसिस जिवाणू अनेक प्रकारच्या चतुष्पाद प्राण्यांच्या मूत्राद्वारे जमिनीवर, अन्नपदार्थांवर अथवा पाण्यात मिसळले जाऊ शकतात.

एका वर्षात जोडीपासून 15 हजार उंदीर
गर्भधारणेनंतर साधारणपणे 21 ते 22 दिवसांत मादी उंदीर पिलांना जन्म देते. एका वेळेस साधारणपणे 5 ते 14 पिलांना ती जन्म देते. जन्म दिलेली पिले पाच आठवडय़ांत प्रजननक्षम होऊन तीदेखील नव्या पिलांना जन्म देतात. यानुसार साधारणपणे एक वर्षात उंदराच्या एका जोडीमुळे 15 हजारपर्यंत नवीन उंदीर तयार होऊ शकतात.

दोन आठवडय़ांत आढळलेले रुग्ण
मलेरिया – 282
डेंग्यू – 166
स्वाइन फ्लू –  53
लेप्टो – 52
कावीळ – 75
चिकनगुनिया – 1

अशी घ्या काळजी
– पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
– स्वाइन फ्लू असल्यास रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, तर स्वाइन फ्लूपासून बचावासाठी गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रूमाल धरावा. मास्क वापरावा.