आईशिवाय नाही जगू शकत, माझी आई मला परत करा! कावेरी यांच्या लेकीचा टाहो

 ‘माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. माझी आई मला हवीय, माझी आई मला परत करा’, असा मन हेलावणारा टाहो वरळी ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणातील मृत कावेरी नाखवा यांच्या मुलीने फोडला. आईसाठी तिच्या लेकीचा टाहो पाहून सर्वांच्याच डोळय़ाच्या कडा अश्रूंनी ओलावल्या.

वरळीमध्ये नुकत्याच घडलेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपी मिहीरसह त्याचे वडील, आई आणि बहिणीसह या प्रकरणात मदत करणाऱया 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकरणात नाहक बळी गेलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. कावेरी यांची मुलगी पोरकी झाली आहे. त्यामुळेच त्यांची मुलगी आईच्या विरहाने अक्षरशः टाहो पह्डीत आहे. याबाबतचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माझी आई मला हवीय

‘मी रडलेली माझ्या आईला आवडणार नाही. मात्र मी जास्त वेळ माझे दुःख थांबवू नाही शकत. आईला कसे विसरणार? ती माझे सर्वस्व आहे. मी माझ्या आईशिवाय राहूच शकत नाही. त्यामुळे मला माझी आई हवीय. माझी आई मला परत करा’!
कावेरी यांची मुलगी

गरीबांना या जगात कोणी वाली नाही! आरोपीच्या वडिलांच्या जामिनावर प्रदीप नाखवा यांची संतप्त प्रतिक्रिया

वरळीत भरधाव वेगाने बीएमडब्ल्यू गाडीने कावेरी नाखवा यांना चिरडणारा आरोपी मिहीर शहा यांच्या वडिलांना न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला, त्यावर कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अपघात झाला तेव्हा मी आरोपीला गाडी थांबवण्याची विनंती करत होतो. मी त्याच्या गाडीच्या बोनेटवर जोरात हात मारला. मात्र, तरीही त्याने गाडी थांबवली नाही. तो भरधाव वेगाने गाडी चालवत पुढे गेला. त्या वेळी माझ्या बायकोला किती वेदना झाल्या असतील? जे घडले ते सर्वांना माहिती आहे. मात्र, प्रशासन कारवाई करायला तयार नाही. झाल्या प्रकारावरून तरी गरीबांचा या जगात कोणी वाली नाही असे दिसते, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रदीप नाखवा यांनी व्यक्त केली.

वरळीत कावेरी नाखवा यांना आरोपी मिहीर शहा याने आपल्या बीएमडब्ल्यू गाडीने चिरडले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत कावेरी यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीचे वडील आणि चालक यांना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी मिहीर शहा अजूनही फरार आहे. मात्र, 24 तासांच्या आतच आरोपीचे वडील राजेश शहा यांना 15 हजारांच्या तात्पुरत्या बाँडवर जामीन मिळाला असून त्यावर सोशल मीडियावर सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रदीप नाखवा यांनीही प्रशासनावर कडाडून टीका केली आहे.

प्रशासन केवळ धनाढय़ांसाठी काम करत आहे!

आरोपीचे वडील राजेश शाह यांना मिळालेल्या जामिनावर बोलताना प्रदीप नाखवा प्रचंड संतप्त झाले. “या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे. हे प्रशासन फक्त श्रीमंत लोकांसाठी काम करते. इथे गरीबांना कुणीही वाली नाही. इथे फक्त राजकारण चालते,’’ असे ते म्हणाले.

आरोपीला वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज केले! जयवंत वाडकर यांचा सनसनाटी आरोप

शहरात जागोजागी सीसीटीव्ही असल्यामुळे कुणीही पोलिसांच्या नजरेतून सुटूच शकत नाही. असे असताना एखादा आरोपी खून करून तब्बल 60 तास मोकाट राहूच कसा शकतो? असा सनसनाटी आरोप अभिनेते जयवंत वाडकर यांनी आज केला. पोलीस त्याचवेळी आरोपीला पकडू शकत होते, पण त्यांनी तसे केले नाही. कारण आरोपी दारूच्या नशेत होता. आरोपीला वाचवण्यासाठी प्रकरण मॅनेज केल्याचेदेखील ते म्हणाले.

वरळीतील दुर्घटनेत बळी गेलेल्या कावेरी नाखवा हिचे काका आणि ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी वरळीची घटना हिट अॅण्ड रनचा प्रकार नसून ही हत्या असल्याचा आरोप केला. या प्रकरणाचा आरोपी मिहीर शहाला 60 तासांनी अटक झाल्याने पोलीस तपासावर वाडकर यांनी शंका व्यक्त केली. ते म्हणाले, आरोपीने बारमध्ये 18 हजारांचे बिल भरले, अपघातानंतर गाडीची मागची नंबर प्लेट काढली तसेच गाडीवरील पक्षाचे चिन्ह मिटवण्याचा प्रयत्न झाला हे सीसीटीव्ही आणि उपलब्ध पुराव्यातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे सगळं कुणी केले, त्यामागे कोण आहे हे पोलिसांना माहितेय. मग आरोपीला पकडायला इतका उशीर का लावला? आज सकाळी सात वाजता मी वरळी पोलीस स्टेशनला पह्न केला तेव्हा तिथे ऑडिशनल सीपी, डीसीपी हजर होते. एवढय़ा सकाळी ते तिथे काय करत होते? नक्कीच काहीतरी शिजलंय, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

न्याय मिळेपर्यंत लढणार

ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करून निष्पाप जीवांचा बळी घेणाऱया आरोपींचा उद्दामपणा आणि पैशांचा माज संपविण्यासाठी मोटर अधिनियम कायद्यात बदल होणे गरजेचे आहे. अपघात करून सहज जामीन मिळत असेल तर कुणालाही कायद्याचा धाक राहणार नाही, असे जयवंत वाडकर म्हणाले. आरोपीने विकृत पद्धतीने कार चालवून माझ्या पुतणीचा जीव घेतला. कावेरीला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा सुरूच ठेवू, असा निर्धार जयवंत वाडकर यांनी व्यक्त केला आहे.