Syed Mushtaq Ali Trophy – श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जिंकले विजेतेपद! फायनलमध्ये मध्यप्रदेशचा केला पराभव

देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवत रणजी करंडक, इराणी ट्रॉफी आणि आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईच्या संघाने सयद मुश्ताक अली करंडकावरही आपले नाव कोरले आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबईविरुद्ध मध्यप्रदेश या दोन संघांमध्ये फायनलचा थरार रंगला. मध्यप्रदेशने दिलेले 175 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत मुंबईने 5 विकटने सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली करंडक आपल्या नावावर केला. यापूर्वी 2022-23 च्या हंगामात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात पहिल्यांदा मुंबईने स्पर्धा जिंकली होती.

मुंबईच्या संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इराणी चषक, रणजी करंडक आणि आता सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मध्यप्रदेशविरुद्ध झालेल्या फायनलच्या सामन्यात मध्यप्रदेशने दिलेले 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. परंतु अजिंक्य रहाने (37 धावा), सूर्यकुमार यादव (48 धावा) यांनी ताबडतोब फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणले. त्यानंतर अथर्व अंकोलेकर (16 धावा) आणि सूर्यांश शेडके (36 धावा) यांनी नाबाद खेळी करत संघाला 5 विकेटने विजय मिळवून दिला.

सय्यद मुश्ताक अली करंडकामध्ये मुंबईचा वंडर बॉय अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 432 धावा करत संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याच बरोबर शार्दूल ठाकूरने 15 आणि मोहित अवस्थीने 13 विकेट घेतल्या. मुंबईला या स्पर्धेमध्ये फक्त केरळ संघाविरुद्ध 43 धावांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु उर्वरित सर्व सामने मुंबईने जिंकले होते. मुंबईने प्रथम गोवा संघाविरुद्ध 26 धावांना, महाराष्ट्राविरुद्ध 5 विकेट्सनी, नागालँगडविरुद्ध 7 विकेट्सनी, सेनादलाविरुद्ध 39 धावांनी, आंध्र प्रदेशविरुद्ध 4 विकेट्सनी, विदर्भाविरुद्ध 6 विकेट्सनी, बडोदा विरुद्ध 6 विकेट्सनी आणि अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरुद्ध 5 विकेट्सने विजय संपादित केला.