‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ समजल्या जाणाऱया मुंबई लोकलच्या प्रमुख स्थानकांत नजीकच्या काळात परदेशात असल्याचा भास होणार आहे. नोकरदारांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रमुख स्थानकांत ‘डिजिटल लाउंज’ म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विमानतळाप्रमाणे मोफत वीज, टेबल-खुर्ची, वायफाय, प्लग पॉईंट, कॅफे आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
उपनगरी मार्गांवरील स्थानकांचा कायापालट करताना पश्चिम रेल्वेने ‘डिजिटल लाउंज’ची संकल्पना प्राधान्याने अंमलात आणण्याचे ठरवले आहे. विमानतळावर वेटिंग रूममध्ये अद्ययावत सुविधा असतात. त्याच धर्तीवर सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रमुख रेल्वे स्थानकांवर ‘डिजिटल लाउंज’ उभारले जाणार आहे. सद्यस्थितीत रेल्वे स्थानकांवरील वेटिंग रूममध्ये प्रवासी रेल्वेची प्रतीक्षा करू शकतात. किंबहुना जास्त पैसे मोजून ‘एक्झिक्युटिव्ह लाउंज’मध्ये आराम करू शकतात. मात्र अद्ययावत सुविधांअभावी कार्यालयीन कामे करता येत नाहीत. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतूने आम्ही ‘डिजिटल लाउंज’ उभारणीचा प्रकल्प राबवणार आहोत, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक तरुण जैन यांनी दिली.
947 कोटींचा खर्च अपेक्षित
स्थानके अद्ययावतीकरण प्रकल्पांतर्गत ‘डिजिटल लाउंज’ची उभारणी केली जाणार असून त्यावर जवळपास 947 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूण 17 स्थानकांत ही व्यवस्था असेल. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱयांनी प्रमुख स्थानकांतील जागांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.
या स्थानकांवर सुविधा
अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, मुंबई सेंट्रल या प्रमुख स्थानकांवर प्राधान्याने ‘डिजिटल लाउंज’ची उभारणी केली जाणार आहे. अंधेरी, गोरेगावसारख्या परिसरात कार्यालयांचे प्रमाण अधिक आहे. तेथील नोकरदारांचा विचार करून हा प्रकल्प लवकरात लवकर अंमलात आणणार आहे. युरोपातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी कार्यालयीन काम करण्याकरिता विशिष्ट जागेची व्यवस्था असते. त्यापासून पश्चिम रेल्वेने प्रेरणा घेतली आहे.
इतर नागरिकांनाही मिळणार लाभ
ही योजना केवळ लोकल प्रवाशांसाठी नसून इतर नागरिकांनाही सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ‘को-वार्ंकग एरिया’चा लाभ घेण्यासाठी प्रत्येक तासाचे ठरावीक भाडे आकारले जाणार आहे. एकावेळी 20 ते 50 लोक ‘डिजिटल लाउंज’मध्ये बसू शकणार आहेत.