थंडीसाठी आठवडाभराचे ‘वेटिंग’, मुंबईचे वातावरण निवडणुकीपर्यंत ‘ताप’लेलेच

नोव्हेंबर निम्मा संपत आला तरी मुंबईत थंडीचा पत्ता नाही. दोन दिवसांपूर्वी तापमान 20 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे थंडी आल्याची चाहूल लागली होती. मात्र पुढच्या 48 तासांत तापमान पुन्हा चढणीला लागले. हवामान खात्याने आणखी आठवडाभर मुंबईत थंडी दाखल होणार नसल्याचे सांगितले. 20 नोव्हेंबर अर्थात निवडणुकीच्या दिवसापर्यंत कमाल 35 ते 36 अंश, तर किमान 24 ते 25 अंश तापमान राहणार आहे.

यंदा दिवाळीत मुंबईकरांनी थंडीऐवजी उकाडय़ाचा असह्य अनुभव घेतला. तापमानातील वाढ आणि त्यात फटाक्यांच्या प्रदूषणाची भर अशा वातावरणात मुंबईकरांनी दिवाळी साजरी केली. नोव्हेंबरचे 15 दिवस उलटत आले तरी शहर व उपनगरांत थंडीची प्रतीक्षा आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात 3 अंशांची मोठी वाढ होऊन 36 अंशांपर्यंत पारा गेला. तसेच पहाटेचे तापमान 22 अंश इतके नोंद झाले. सोमवारी किमान तापमान 20 अंश होते. दरम्यान, हवामान खात्याने आणखी आठवडाभर तरी मुंबई शहर व परिसरात थंडी दाखल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

21 नोव्हेंबरनंतरच तापमानात मोठी घट

शहरात पूर्वेकडील वारे वाहत असल्याने थंडीची ‘एण्ट्री’ लांबणीवर पडली आहे. पुढील आठवडाभर अधूनमधून तापमानात काही प्रमाणात घसरण होईल, मात्र 21 नोव्हेंबरनंतरच तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबईत थंडी दाखल होण्यासाठी उत्तरेकडील वारे वाहू लागले पाहिजेत. सध्या शहरात पूर्वेकडील वारे वाहत असल्याने उकाडा जाणवत आहे. पुढील आठवडाभर मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात कमाल तापमान 35 ते 36 अंशांच्या पुढे राहील, तर किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक असेल. मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढेल: सुषमा नायर, हवामान तज्ञ, कुलाबा वेधशाळा