
मुंबईतील टँकर असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला संप अखेर मागे घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई टँकर असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. यातच पालिकेने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह टँकर चालकांच्या संपावर बैठकीत तोडगा निघाला. यानंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेतला.
दरम्यान, केंद्राच्या भूजल प्राधिकरणाचे जाचक नियम राज्य सरकारने शिथील करावेत यासाठी मुंबईतील टँकर चालकांनी मुंबईत गुरुवारपासून सुरू केलेला संप पुकारला होता. टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून व्यावसायिक, बांधकाम प्रकल्प, हॉटेल आणि अनेक आस्थापनांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. मात्र टँकर असोसिएशनने संप मागे घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.