युवासेनेच्या सिनेट सदस्यांची विविध समित्यांवर निवड; मुंबई विद्यापीठाच्या विशेष अधिसभा बैठकीत निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, स्थायी समिती आणि अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवरील निवडणूक/नामनिर्देशाचे निकाल आज झालेल्या विशेष अधिसभेच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. यात युवासेनेच्या सिनेट सदस्यांची विविध समित्यांवर निवड झाली. नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून स्थायी समितीवर हॅटट्रिक करून प्रदीप सावंत हे निवडून आले. ते 2010 ते 2015 तक्रार निवारण समिती तर 2018 ते 2022 व्यवस्थापन परिषदेवर निवडून आले होते. व्यवस्थापन परिषद सदस्यपदी खुल्या प्रवर्गातून मिलिंद साटम आणि आरक्षित सदस्यपदी शीतल शेठ-देवरुखकर निवडून आले आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या आज झालेल्या सिनेट सभेमध्ये व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षक आणि नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांमधून स्थायी समिती, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच तक्रार निवारण समिती यांच्यावर सदस्य नियुक्ती होण्याकरिता निवडणूक झाली. यानुसार व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य गटातून प्रा. दिलीप भारमल (खुला प्रवर्ग) आणि प्रा. दिलीप पाटील (इतर मागासवर्ग प्रवर्ग) यांची बिनविरोध निवड झाली. अध्यापक गटातून झालेल्या एकूण 69 मतदानातून डॉ. अनुप पळसोकर (खुला प्रवर्ग) हे 51 मतांनी निवडून आले तर डॉ. जगन्नाथ खेमनर (विमुक्त जाती प्रवर्ग) हे बिनविरोध निवडून आले. व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून सुनील जोशी (खुला प्रवर्ग) बिनविरोध निवडून आले. विद्यापरिषदेवर व्यवस्थापन प्रतिनिधी गटातून रवींद्र घोडविंदे यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समिती या प्राधिकरणावर प्राचार्य गटातून प्रा. वसंत माळी यांची बिनविरोध निवड झाली. अध्यापक व कर्मचारी तक्रार निवारण समितीवर अध्यापक गटातून डॉ. विनोद कुमरे हे 48 मतांनी निवडून आले तर अध्यापकेतर कर्मचारी गटातून संतोष निकम यांची बिनविरोध निवड झाली.

मुंबई विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर निवडून/नामनिर्देशाने आलेल्या सर्व मान्यवर सदस्यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. या निवडणुकीच्या कामी उपकुलसचिव (निवडणूक) विकास डवरे, सहाय्यक कुलसचिव रमेश दामसे आणि त्यांच्या चमूने अथक प्रयत्न घेतले. आज पार पडलेल्या निवडणुकीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांचे विशेष सहाय्य लाभले.