आज सिनेटसाठी मतदान! युवासेनेचे 10 शिलेदार निवडणुकीच्या मैदानात

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी उद्या मंगळवार 24 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत दहाच्या दहा जागा जिंकून बाजी मारण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना सज्ज झाली आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक मागील दोन वर्षांपासून वादात सापडली आहे. पराभवाच्या भीतीने मिंधे-भाजप सरकारकडून मुंबई विद्यापीठ कायदा व नियम धाब्यावर बसवून ही निवडणूक होऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. मतदान दोन दिवसांवर आलेले असताना रविवार 22 सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकीला अचानकपणे स्थगिती देऊन रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या विरोधात युवासेनेने तत्काळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा पुटील राजकीय डाव हाणून पाडला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून 27 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत 10 जागांसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 13 हजार 405 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत पदवीधर मतदारांची संख्या खूपच कमी आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

दहा जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील दहा सिनेट सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात पाच जागा या खुल्या प्रवर्गासाठी तर उर्वरित पाच जागा या एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. या दहा जागांसाठी एकूण 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

युवासेनेचे हे शिलेदार रिंगणात

z खुला प्रवर्ग (ओपन) ः प्रदीप सावंत, अॅड. अल्पेश भोईर,
मिलिंद साटम, परमात्मा यादव, किसन सावंत
– इतर मागासवर्ग (ओबीसी) ः मयूर पांचाळ
– महिला प्रवर्ग ः स्नेहा गवळी
– अनुसूचित जाती (एससी) ः शीतल सेठ देवरुखकर
– अनुसूचित जमाती (एसटी) ः डॉ. धनराज कोहचाडे
– विज-भज (डीटी-एनटी)ः शशिकांत झोरे

2018च्या निवडणुकीत युवासेनेची सर्व जागांवर बाजी

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी 2018मध्ये झालेल्या निवडणुकीत दहा जागांसाठी 68 उमेदवार उभे होते. त्या वेळी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत युवासेनेने सर्वच्या सर्व 10 जागा जिंकून बाजी मारत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत इतिहास घडवला होता.

मिंधे, मनसेची निवडणुकीतून माघार

राज्यातील सत्ताधारी मिंधे गटाने एकही उमेदवार मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत उभा केलेला नाही. मनसेनेदेखील या निवडणुकीत उमेदवार दिलेला नाही. युवासेना आणि भाजप प्रणीत अभाविपने सर्वच्या सर्व दहा जागांवर उमेदवार दिले आहेत. छात्रभारती, बहुजन विकास आघाडीने काही जागांवर उमेदवार दिले आहेत.

– मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील 38 मतदान केंद्रांवर आणि 68 बूथवर मतदाची प्रकिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 13 हजार 405 मतदार पात्र असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.