मिंध्यांची टरकली, दुसऱ्यांदा निर्णय फिरवला, विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती; अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली

मुंबई विद्यापीठाने रविवारी होणारी सिनेट निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी स्थगित केल्याने राज्यात दोन वर्षांपूर्वी गद्दारीने स्थापन झालेल्या मिंधे सरकारमध्ये शिवसेना आणि युवा सेनेची प्रचंड भीती असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना-युवा सेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीत मिंधे-भाजपचा निभाव लागणार नाही याची भीती निर्माण झाल्यानेच ही निवडणूक अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत विद्यापीठाने पुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे परिपत्रकच जारी केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दहा पदवीधर नोंदणीपृत सिनेटची मुदत ऑगस्ट 2022 मध्ये संपली. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी सिनेट निवडणूक घेऊन कारभार करणे गरजेचे होते. मात्र गद्दारीने स्थापन झालेल्या मिंधे सरकारला  शिवसेना-युवा सेनेची भिती असल्याने ही निवडणूक प्रक्रिया जाणीवपूर्वक टाळण्यात आली. याआधी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सिनेट निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अटीचे कारण देत ही प्रक्रिया रद्द करून  सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. तर आता निवडणुकीसाठी मतदान केंद्रे, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सर्व प्रक्रिया पार पडली असताना पुन्हा एकदा मिंधे सरकारच्या दबावाखाली सिनेट निवडणुकीला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारांना सायंकाळी रविवारी होणाऱया निवडणुकीसाठी मोबाईलवर मेसेजही पाठवण्यात आले होते.

ये डर जरूरी है!

गेल्या दोन वर्षांत सर्वच स्तरांवर सफशेल अपयशी ठरल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिंधे-भाजपला जनतेने नाकारल्याने सिनेट निवडणुकीतही पदवीधर आपल्याला लाथ मारतील अशी भिती मिंध्यांना वाटत आहे.

या भीतीमुळेच 7 मार्च 2022 रोजी मुदत संपूनही मुंबई महानगरपालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यायला मिंधे-भाजपची हिंमत होत नसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत युवा सेनेने भाजप, मनसेचा सुपडा साफ करीत सिनेटच्या सर्वच्या सर्व म्हणजे दहाही जागांवर ‘शतप्रतिशत’ निर्विवाद विजय मिळवून विरोधकांना चारीमुंड्या चित केले होते.

आणि त्यामुळेच मिंध्यांनी विद्यापीठावर दबाव आणून ही निवडणूक स्थगित केल्याची जोरदार प्रतिक्रिया सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘ये डर जरूरी है’! असा टोलाही मिंध्यांना लगावला जात आहे.

सिनेट निवडणूक स्थगित केल्यामुळे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि भाजप युवा सेनेला किती घाबरतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. हे लोक ‘एक देश एक निवडणूक’ घेण्याच्या बाता मारतात आणि सिनेट निवडणूक टाळतात. डरते रहो, यह डर अच्छा है. – आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख