
मुंबई विद्यापीठातील सुमारे 100 वर्षांहून अधिक जुन्या आणि मोडकळीला आलेल्या 68 इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेला मास्टर प्लॅन बनवण्यासाठी मुंबई विद्यापीठाबरोबर आमच्या 2021 पासून आतापर्यंत चार बैठका झाल्या आहेत, मात्र विद्यापीठाने यात कोणतीही रुची दाखवली नाही. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाने आता टीडीआर बदल्यात थेट आर्थिक नुकसानभरपाई रकमेच्या स्वरूपात द्यावी, अशी मागणी केली आहे. आम्ही मुंबई विद्यापीठाला नेहमीच सहकार्य केले आहे, मात्र त्यांच्याकडून कायम उदासीन भूमिका घेण्यात आली, असा दावा करत एमएमआरडीएनेच मुंबई विद्यापीठाची पोलखोल केली आहे.
मुंबई विद्यापीठातील अंदाजे 68 जुन्या इमारतींच्या दुरवस्थेबद्दल दैनिक ‘सामना’ने ‘एमएमआरडीएचा मुंबई विद्यापीठाला 1200 कोटींचा ठेंगा’ अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर राज्य सरकारच्या उच्च तंत्रज्ञान विभागाने मुंबई विद्यापीठाकडे खुलासा मागितला, तर एमएमआरडीएने थेट मुंबई विद्यापीठालाच उदासीन म्हणत आरोपीच्या पिंजऱयात उभे केले. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या जुन्या इमारतींची पुनर्बांधणी आणि टीडीआरचे 1200 कोटी रुपये विद्यापीठाला मिळावेत यासाठी युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी विद्यापीठ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.
विद्यापीठ काय म्हणते…
एमएमआरडीए आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार एमएमआरडीए हे मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लॅन विनामूल्य करून देणार आहेत. त्यानुसार एमएमआरडीएने मुंबई विद्यापीठाचा ढोबळ मास्टर प्लॅन तयार केला आहे.
स्ट्रक्चरल ऑडिट सुरू
मुंबई विद्यापीठाच्या सी. डी. देशमुख भवन इमारतीची दुरवस्था झाली आहे, मात्र आता या इमारतीच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. देशमुख भवन आणि विद्यापीठातील इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे, असा खुलासा मुंबई विद्यापीठाने उच्च तंत्रज्ञान विभागाकडे केला आहे.