गलती से मिस्टेक… मुंबई विद्यापीठानं पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चंच स्पेलिंग चुकवलं, लाखो विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप

मुंबई विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रामध्ये विद्यार्थ्यांची नावे चुकवल्याचे याआधी अनेकदा समोर आले आहे. मात्र यावेळी विद्यापीठाने चक्क स्वत:च्याच नावाचे स्पेलिंग चुकवले आहे. 2023-24 बॅचसाठी देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाने ‘मुंबई’चेच स्पेलिंग चुकीचे लिहिले आहे. पदवी प्रमाणपत्राच्या लोगोमध्ये ‘University of Mumabai’ असे लिहिण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे ही पदवी प्रमाणपत्र विद्यापीठाने महाविद्यालयांनाही पाठवली आहेत. हजारो, लाखो विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात आले. स्पेलिंग चुकल्याचे लक्षात येताच अनेक महाविद्यालयांनी ही प्रमाणपत्र मुंबई विद्यापीठाला परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दीक्षांत सोहळ्यात वाटली प्रमाणपत्र

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 7 जानेवारी रोजी पार पडला. याच सोहळ्यात अनेक विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. 2023-24 या शैक्षणिक वर्षात 1 लाख 64 हजार विद्यार्थ्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यापैकी किती विद्यार्थ्यांना स्पेलिंग चुकलेले प्रमाणपत्र मिळाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विद्यापीठाची लाज काढली

आपल्याच नावाचे स्पेलिंग चुकवणे ही मुंबई विद्यापीठासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे एका महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी म्हटले. लोगोवरील नाव चुकल्याने हे प्रमाणपत्र बोगस वाटत आहे. नोकरी किंवा पदव्युत्तर शिक्षणावेळी ही प्रमाणपत्र बोगस ठरवली गेली तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय होणार? असा सवाल अन्य एका मुख्याध्यापकांनी उपस्थित केला.

हैदराबादच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट

मुंबई विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र छापण्याचे कॉन्ट्रॅक्ट हैदराबादच्या कंपनीला देण्यात आले होते. आता ही चूक लक्षात विद्यापीठ ती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तांत्रित कारणांमुळे छपाई करताना ही चूक झाली असावी असे मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता नवीन पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठ व उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी माफी मागावी – वर्षा गायकवाड

ही फक्त लाजिरवाणी बाब नसून प्रमाणपत्र पुन्हा छापावी लागतील. यामुळे पदवी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना उशीर होईल. याबद्दल मुंबई विद्यापीठ आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी माफी मागावी. तसेच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून महिन्याभरात विद्यार्थ्यांना नवीन प्रमाणपत्र द्यावीत, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक्सवर पोस्टद्वारे केली.