प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांचे सोमवारी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य केलं आहे.
डॉ. स्नेहलता देशमुख या शिव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठात्या होत्या. 1995 मध्ये त्यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धडाडीचे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर त्या विद्यार्थ्याच्या किंवा विद्यार्थिनीच्या आईचे नावही लिहिणे.
गर्भसंस्कार तंत्र आणि मंत्र, तंत्रयुगातील उमलती मने, अरे संस्कार संस्कार इत्यादी ग्रंथ त्यांनी लिहले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’, हे पुरस्कार मिळाले होते. सध्या त्या मुंबईच्या पार्ले टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून त्या कार्यरत होत्या.