मुंबई विद्यापीठाच्या 968 कोटींच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मंजुरी, 147 कोटींची तूट

गुणवत्ता, सर्वासमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा 2025-26 या वित्तीय वर्षाचा रुपये 968.18 कोटींचा अर्थसंकल्प आजच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये 147 कोटी 63 लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.

अर्थसंकल्पामध्ये संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक समन्वय उपक्रम यासह शैक्षणिक आणि गव्हर्नंस उत्कृष्टता उपक्रमांसाठी 75 कोटींची भरीव तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शिवाय अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, महासागर संशोधन, शाश्वत शेती, विषाणूशास्त्र, हवामान अनुकूलता विकास, आणि कार्यक्षमता संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे.

असे आहेत नावीन्यपूर्ण उपक्रम

  • गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता शैक्षणिक उपक्रम 10 कोटी
  • संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार 15 कोटी
  • विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम 5 कोटी
  • माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ- औद्योगिक साहचर्य उपक्रम 5 कोटी
  • गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता गव्हर्नंस उपक्रम 35 कोटी