नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी तिजोरीत मोठी भर पडली आहे. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, नववर्षाचे स्वागत करताना नियम मोडल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी तब्बल 17800 वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईवेळी ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेतून सरकारी तिजोरीत 89.19 लाख रुपये जमा झाले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण शहरात केलेल्या बंदोबस्तावेळी बेशिस्त वाहनचालकांनावर ही कारवाई केली आहे.
मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे आणि नो-एंट्रीत प्रवेश करणे, अशा घटनांमध्ये कारवाई करून दंड आकारण्यात आल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वेग मर्यादा न पाळल्याने अनेक दुचाकीस्वारांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अनेक चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्ट न लावल्यानेही दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल फोनवर बोलत असल्याचे आढळून आल्यानेही अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी एकूण 89 लाख 19 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड आणि जुहू चौपाटीसह मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती.