भर समुद्रात थरार; समुद्राच्या लाटांमुळे बोटीला पडले छिद्र, स्पीड बोटीमुळे वाचले 130 प्रवाशांचे प्राण

समुद्रामध्ये जोरदार वारा सुटल्यामुळे मुंबईहून मांडवाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी बोटीला छिद्र पडले. छिद्र पडल्यामुळे बोटीमध्ये पाणी भरले आणि 130 प्रवशांचा जीव टांगणीला लागला. परंतु वेळीच मदतीसाठी फोन केल्यामुळे सर्व प्रवशांचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अंजठा कंपनीची प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून 130 प्रवाशांना घेऊन 5.30 च्या सुमारास मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. साधारण 1 ते 1.5 किमी अंतरावर बोट गेली असता वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा बोटीला जोरजोरात धडकू लागल्या. बोट फायबरची असल्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि त्यामुळे बोटीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवशांनी तत्काळ मांडवी जेटी येथे फोन करून मदत मागितली. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता मांडवी जेटीवरुन तत्काळ स्पीड बोट समुद्रात मदतीसाठी धावल्या. 130 प्रवशांना सुखरुप मांडवी जेटी येथे आणण्यात आले आहे. तसेच अजंठा कंपनीची बोटही सुखरूप मांडवी जेटी आणली आहे.