मुंबईतल्या पर्यटन स्थळांचा होणार विकास; काळा घोडा, रिगल जंक्शन परिसर, कोळीवाड्यांचा समावेश

मुंबईत आणि मुंबईबाहेर राहणारे रहिवासी एक दिवस तरी ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी मुंबईतील चौपाटी, वास्तू, प्रेक्षणीय स्थळे यांना भेटी देतात हे लक्षात घेऊन मुंबईतली काही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यावर आणि आहे त्या पर्यटन स्थळांचा अधिक विकास करण्यावर मुंबई महापालिका भर देणार आहे. त्यामुळे काळा घोडा, रिगल जंक्शन परिसरासह मुंबई कोळीवाडे यांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.

मुंबईसह देशविदेशातील पर्यटक मोठय़ा हौसेने मुंबईत फिरतात, मात्र नैसर्गिक असलेल्या पर्यटन स्थळांबरोबर काही पृत्रिम पर्यटन स्थळेही विकसित करून त्याच्या माध्यमातून पर्यटन घडवण्यावर महापालिकेने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कला महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार आहे. काळा घोडा परिसराचा कला आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे तर रिगल जंक्शन परिसरात पादचारी आणि वाहनांच्या् सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे वापरात नसलेल्या 4 हजार 50 चौरस मीटर जागेवर पॉझ पॉइंट म्हणून प्लाझामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही परिसरांचे जागतिक वारसा म्हणून असलेले महत्त्व अधिक वाढणार आहे. यासाठी पालिका अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वरळी, माहीम, वर्सोवा यासह सर्व कोळीवाडय़ांचा विकास केला जाणार असून त्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबई पाहता येणार

लंडन शहातील ‘लंडन आय’ या पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱया भव्य पाळण्याच्या धर्तीवर मुंबईतही ‘मुंबई आय’ उभारण्यात तयार आहे. ‘लंडन आय’मध्ये बसून संपूर्ण लंडन शहराचा नजारा पर्यटक पाहू शकतात. त्याच धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारून पर्यटनाचे आणखी एक आकर्षक केंद्र तयार करण्यात येणार आहे. ‘मुंबई आय’ सरकारी आणि खासगी भागीदारीत उभारण्यात येणार आहे.