मुंबईसह राज्यभरात पावसाने रुद्रावतार धारण केला आहे. अक्षरशः आभाळ फाटल्यासारखी स्थिती आहे. मुंबईत गुरुवारी तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा कोलमडली तर रस्ते मार्गांवर वाहनांची रखडपट्टी झाली. अतिवृष्टीमुळे पुण्यात पूर आला असून इमारतींच्या दुसऱया मजल्यापर्यंत पाणी गेल्याने बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. महाडमधील सावित्री नदीसह रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मुंबई-ठाण्यासह रायगड, पालघरला उद्यापर्यंत पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
नक्षत्राचा बेडूक डराव डराव करायला लागला आणि गेल्या आठ दिवसांपासून पुष्य नक्षत्रातील पावसाचं तुफानच आलं आहे. त्यातच बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱया मुसळधार पावसाने 26 जुलै 2005 च्या भयंकर पावसाचा ट्रेलरच दाखवला. रायगड जिह्यातील सावित्री, गांधारी, काळ, अंबा, पुंडलिका तसेच ठाण्यातील उल्हास, काळू, वालधुनीसह पालघरातील सर्वच नद्या कोपल्या असून अनेक शहरांना पुराचा तडाखा बसला आहे. महाड, पोलादपूर, नागोठणे, पाली, रोहे पाण्याखाली गेले आहे. ठाणे शहरातही सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, भिवंडीचीदेखील तुंबई झाली. पोलादपूर, तळा तालुक्यात वादळी वाऱयाने विजेचे पोल पडल्याने या भागात आठ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला आहे. उल्हास नदीवरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण-मुरबाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून 35 हून अधिक गावांचा संपर्क तुटला. पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तिन्ही जिह्यांमध्ये पडझडीच्या घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही.
महाडकरांचे जागते रहो..
काळ, सावित्री नदीने रौद्ररूप धारण केल्याने भल्यापहाटे महाडमध्ये पाणी घुसले. बाजारपेठांसह शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या. बुधवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या धुवांधार पावसामुळे महाड व पोलादपूरकरांनी रात्र जागून काढली. चोवीस तासांत महाडमध्ये 124 तर पोलादपूरमध्ये 161 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. एनडीआरएफचे पथक सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
ठाण्याच्या आपत्ती कक्षात मदतीचे शेकडो कॉल
ठाणे पालिका हद्दीत गेल्या 48 तासांत तब्बल 253.17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर शहरात अनेक पडझडीच्या घटना घडल्या असून ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागात मदतीसाठी 105 फोन खणखणले असल्याची माहिती आपत्ती विभागाच्या कक्षाने दिली आहे. यामध्ये आग लागणे, झाडे पडणे, झाडांच्या फांद्या पडणे, झाडे धोकादायक अवस्थेत असणे, ठिकठिकाणी पाणी तुंबणे, धोकादायक होर्डिंग्ज, घराचे छत पडणे या घटनांचा समावेश आहे. दरम्यान पालिकेची आपत्ती टीम 24 तास सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आपत्ती प्रमुख याशी तडवी यांनी दिली.
कल्याणमध्ये म्हशींचे ‘पार्किंग’
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी रेतीबंदर रोडवर खाडीचे पाणी चाळीत तसेच तबेल्यांमध्ये घुसले. त्यामुळे पालिकेने चाळीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच येथील शेकडो म्हशींना गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील दुभाजकावर दुतर्फा बांधण्यात आले. त्यामुळे या मार्गावर जणू म्हशींचे पार्किंगच लागले होते.
300 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदी लगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीशेजारी असलेल्या मांजरली, हेंद्रेपाडा, वालिवली, सोनिवलीतील काही भागांत रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास शहरातील सखल भाग जलमय होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून जवळपास 300 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. बदलापूर पश्चिमेकडील बीएसयूपीच्या इमारतीत या नागरिकांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱयांनी उल्हास नदी परिसरात तळ ठोकला असून एनडीआरएफची टीमही बदलापुरात दाखल झाली आहे.
केडीएमसीने शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
जोरदार पावसामुळे खाडीतील पाणी थेट गणेशघाट, रेतीबंदर परिसरातील सखल भागात घुसले. 246 घरांत पाणी शिरल्याने 640 हून अधिक नागरिकांना अग्निशमन दल व पालिका अधिकाऱयांनी सुरक्षितस्थळी हलवले.
पुढचे दोन दिवस अलर्ट
पालघर जिह्यात पुढील दोन दिवस अलर्ट जाहीर केला आहे. जिह्यात सोसाटय़ाच्या वाऱयासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात किनारपट्टी भागात 35 ते 65 किलोमीटर प्रतितास वादळी वारे सुटण्याची शक्यता असून तब्बल 200 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. हीच अवस्था रायगड आणि ठाणे जिह्यातही असण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अलर्ट देण्यात आला आहे.
पोलीस भरती पुढे ढकलली
ठाणे जिह्यामध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस व हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने महिला पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी राबोडीतील साकेत मैदान येथे 26 आणि 27 जुलै रोजी होणार होती. परंतु सध्या जिह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊसाने ही परीक्षा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कार्यालयाने दिली आहे..
– पोलादपूर व तळा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱयामुळे विजेचे खांब तसेच उन्मळलेल्या झाडांमुळे तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे अधिकाऱयांनी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले. मोखाडय़ातही घानवळ, धामणी आणि ब्राह्मण गाव येथे घरांची पडझड झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
बुधवारी रात्रीपासून जोर वाढल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने रायगड, ठाणे तसेच पालघर जिह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मात्र सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शासनाचे परिपत्रक मिळण्यापूर्वीच शाळेत पोहोचल्याने त्यांना आल्या पावली पुन्हा घर गाठावे लागले. दरम्यान पावसाचा जोर पुढील चोवीस तास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याने उद्यादेखील ठाणे शहरासह अन्य भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
– धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाल्याने रायगड जिह्यातील मोरबे, हेटवणे धरणासह सर्वच धरणे जवळपास काठोकाठ भरली आहेत. तसेच मोडकसागर, तानसा धरण ओव्हरफ्लो झाले असून भातसा, वैतरणा, बारवी धरण काठोकाठ भरले आहे.
– कर्जतच्या शेलू ग्रामपंचायत हद्दीत केबीके नगर वसले असून येथे पन्नासहून अधिक चाळी आहेत. उल्हास नदी उलटल्याने या चाळींमध्ये पुराचे पाणी शिरले. खबरदारी म्हणून येथील बाराशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. या भागात पुरात अडकलेल्या विमल पाल या गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने आरोग्य विभागाने तिला सुखरूपपणे नेरळ प्राथमिक आरोग्य पेंद्रात दाखल केले.
पुराचा पालीला वेढा
अंबा नदीचे पाणी पाली, नागोठणे शहरात घुसल्याने मोठे नुकसान झाले. बाजारपेठांमधील दुकाने व घरांमध्ये पाणी शिरल्याने सर्वत्र चिखल झाला होता. रोहा तालुक्यातही पुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केल्याने अष्टमी, वरसे, रोटमध्ये पुराचे पाणी शिरले. रोहा, कोलाड रस्ता पाण्याखाली गेल्याने हा मार्ग बंद करण्यात आला. प्रशासनाने नागरिकांना अलर्ट जारी केला आहे.
गावकऱयांची नाकाबंदी
भातसा नदीवरील पूल महिन्याभरात चौथ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे रहदारीचा रस्ता बंद झाल्याने वालकस बेहरे व मठाची वाडी येथील जवळजवळ बाराशे लोकांचा तीन दिवसांपासून संपर्क तुटला आहे. गावातून बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांना रेल्वे ट्रक ओलांडून ये-जा करावी लागत आहे.
जनजीवन विस्कळीत
भिवंडी शहरातील भाजी मार्पेट, तीनबत्ती, बाजारपेठ, कमला हॉटेल, कल्याण नाक्यासह अनेक भागांत पुराचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पाणी तुंबलेल्या भागात दोरखंडाच्या सहाय्याने नागरिक सुरक्षितस्थळी जात होते.
बुजवलेले खड्डे तासाभरात उखडले
तलासरी ः तलासरी उड्डाणपूल तसेच सर्व्हिस रस्त्यावर दोन महिन्यांपासून प्रचंड खड्डे पडले होते. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले होते. मात्र धो धो पावसात पंत्राटदाराने खड्डे भरणीचा फार्स केला खरा, पण अवघ्या तासाभरात मातीमिश्रीत खडीने भरलेले रस्ते उखडले गेले. त्यामुळे तलासरीवासीयांचा खड्डेमय प्रवास कायम राहणार आहे.