मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे गारठा

उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण राज्यभरात पुन्हा एकदा थंडीची लाट धडकली आहे. उत्तर हिंदुस्थानातून थंड वारे मुंबई-महाराष्ट्राच्या दिशेने प्रवाहित झाले आहेत. त्या वाऱयांमुळे पुढील तीन-चार दिवसांत राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. तापमान यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळी गाठण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी सांताक्रुझमध्ये 15 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. ठाणे, नवी मुंबईतही 15 अंश किमान तापमान नोंदवले गेले.

गेल्या आठवडय़ात कमाल तापमानाच्या पाऱयाने सात वर्षातील उच्चांक गाठला होता. मात्र, पश्चिमेकडून आलेल्या वाऱयांचा अडसर दूर झाल्यानंतर मंगळवारी किमान तापमानात अचानक मोठी घसरण झाली. सांताक्रुझमध्ये 15 अंश, तर कुलाब्यात 18 अंश इतके किमान तापमान नोंद झाल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली. शेजारील ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही तापमानात मोठी घसरण झाली. उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱयांमुळे मुंबई-महाराष्ट्रात थंडीची लाट धडकली आहे. पुढील तीन-चार दिवस थंडीचा कडक वाढताच राहील. मुंबईचे तापमान 14 अंशांच्या नीचांकी पातळीवर खाली येईल. तसेच राज्यात अनेक ठिकाणी 10 अंशांपेक्षा कमी तापमान नोंद होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

हवेची गुणवत्ता समाधानकारक

मुंबईत मंगळवारी सकाळी हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत होती. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 127 इतका नोंद झाला. 25 मॉनिटरिंग स्टेशनपैकी शिवाजीनगर-मानखुर्द येथील एक्यूआय-249 अंक अशा खराब पातळीवर नोंद झाला, तर बोरिवली येथील एक्यूआय 100 अंकाच्या घरात होता. उर्वरित 23 मॉनिटरिंग स्टेशनवरील एक्यूआयमध्ये सुधारणा होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले.