
मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकली आहे. सलग तीन दिवस 37 अंशांच्या पातळीवर राहिलेले तापमान रविवारी थेट 38 अंशांच्या घरात गेले. तापमानात सरासरीपेक्षा सहा अंशांची मोठी वाढ झाली. त्यामुळे शहर परिसरासह उपनगरांत वैशाख वणव्याची धग जाणवत आहे. फेब्रुवारीअखेरीस ‘रेकॉर्डब्रेक’ तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या उत्तरेकडील थंड वाऱयांच्या मार्गात प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा अडथळा निर्माण झाला. त्या वाऱयांनी थंड वाऱयांची वाट रोखल्याने मुंबईत उन्हाची दाहकता वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात वाढ नोंद होत आहे. रविवारी सांताक्रुझमध्ये कमाल 37.2 अंश तर किमान 21 अंश तापमानाची नोंद झाली. कमाल आणि किमान पातळीत सरासरीपेक्षा अनुक्रमे सहा आणि तीन अंशांची वाढ झाली. याचवेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 65 टक्के होते. आकाश निरभ्र असल्याने मुंबईत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. शहरात पुढील आठवडाभर म्हणजेच 1 मार्चपर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.