
गेल्या काही काळापासून स्टँडअप कॉमेडी विषय विविध कारणांनी चर्चेत आहे. मुंबई हे स्टँड-अप कॉमेडीयनसाठी महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने परफॉर्म केलेलं ‘मेरी नजर से तुम देखो, तो गद्दार नजर वो आये’ हे विडंबन गीत मिंधे गटाला झोंबलं आहे. त्यांनी कुणाल कामरावर नुसती टीका केली नाही तर ज्या स्टुडिओत हा कार्यक्रम होतो त्या स्टुडिओ मध्ये देखील तोडफोड केली आहे. मात्र या प्रकारानंतर स्टुडिओ व्यवस्थापनाने अत्यंत रोखठोक भूमिका घेतली आहे.
मुंबईतील स्टँड-अप कॉमेडी शोसाठी पसंतीचे ठिकाण असलेल्या हॅबिटॅट स्टुडिओची रविवारी रात्री मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. यानंतर स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
द हॅबिटॅटने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट मध्ये म्हटले आहे की, ‘आपल्याला आणि आपल्या मालमत्तेला धोक्यात न टाकता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधून काढेपर्यंत स्टुडिओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे’.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तोडफोडीच्या कृत्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे, चिंता वाढली आहे आणि आम्ही भंगलो आहोत. खरंतर कलाकार त्यांच्या विचारांसाठी आणि सर्जनशील मांडणींसाठी पूर्णपणे जबाबदार आहेत. आम्ही कधीही कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या कंटेंटमध्ये सहभागी झालो नाही, परंतु अलिकडच्या घटनांमुळे आम्हाला पुन्हा विचार करायला लावले आहे की आम्हाला प्रत्येक वेळी कसे दोषी ठरवले जाते आणि लक्ष्य केले जाते जसे की आम्ही कलाकाराचे प्रॉक्सी आहोत’.
महत्त्वाची बाब म्हणजे हाच स्टुडिओ ‘इंडियाज गॉट लेटेंट’ एपिसोडमुळे बातम्यांमध्ये होता, ज्यात YouTuber रणवीर अलाहबादियाच्या विधानाने मोठा वाद निर्माण झाला होता.
यापूर्वी, स्टुडिओने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की ते कुणाल कामराच्या व्हिडीओच्या निर्मितीमध्ये सहभागी नव्हते आणि त्याने व्यक्त केलेल्या विचारांना त्यांचा पाठिंबा देखील नाही’. “या व्हिडीओमुळे दुखावलेल्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो’. मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओमधील कॅमेरे, लाईट आणि स्पीकरवर खुर्च्या फेकत मोडतोड केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.