‘मुंबई श्री’चे पोझयुद्ध आज रंगणार

मुंबई शरीरसौष्ठवाची खरी संपत्ती शुक्रवारी मुंबईकर क्रीडाप्रेमींना याची डोळा पाहायला मिळणार. त्यात कुणाचे बायसेप्स भारी असतील तर कुणाचे ट्रायसेप्स. काहींची छाती पाहून प्रेक्षकांचे उर भरून येईल तर कुणाची शोल्डर पाहून लय भारी वाटेल. वरच्या गटात तर काफ, थाइज, अॅब्ज आणि बॅक मसल्स म्हणजे जणू काही बारीक नसानसांचे विणलेले जाळेच असल्याचा अनुभव येईल. अत्यंत जोशपूर्ण वातावरण. लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या सेलिब्रेशन क्लबसमोरील लोखंडवाला गार्डन येथे पार पडणाऱ्या मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शरीरसौष्ठवाचा सळसळता उत्साह पाहण्यासाठी शरीरसौष्ठवप्रेमींचा जनसागर उसळणार हे निश्चित आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून मुंबईच्या शरीरसौष्ठवाला नवा विजेता लाभणार आहे.

गेली चार महिने ज्या स्पर्धेत आपले पीळदार स्नायू दाखविण्यासाठी मुंबईचे युवा शरीरसौष्ठवपटू व्यायामशाळेत तासन्तास घाम गाळत आहेत त्या मानाच्या आणि हक्काच्या मुंबई श्री स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा होत नसली तरी उद्या थेट स्पर्धेसाठी मुंबईतील तब्बल दोनशेपेक्षा अधिक खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावतील. 200 पैकी 40 खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असून प्रत्येक खेळाडू रोख पुरस्काराचा मानकरी ठरेल. प्रत्येक गटात किमान 20 खेळाडू असल्यामुळे त्यापैकी पाच खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करताना रेफ्रिजना डोळ्यांत तेल घालून निरीक्षण करावे लागणार आहे.

मुंबई श्रीसाठी काँटे की टक्कर

या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेसह महिलांचे शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् असे तीन प्रकार स्पर्धेत उतरणार आहेत. अर्थातच मुंबई श्री स्पर्धेतील मुख्य फेरीतील 8, फिजीक स्पोर्टस्चे 2 आणि महिलांचा एक अशा 11 गटांमधून किमान 250 खेळाडू आपले पीळदार स्नायू दाखवतील. गणेश उपाध्याय, संदीप सावळे, भगवान बोराडे, विशाल धावडे, उबेद पटेल, संकेत भरम, अभिषेक लोंढे, सौरभ म्हात्रे, अरुण नेवरेकर, अमित साटम, संजय प्रजापती, अमोल जाधवसारखे खेळाडू आपल्या पीळदार सौष्ठवाच्या जोरावर मुंबई श्रीला गवसणी घालण्यासाठी प्रयत्न करतील.