
घरगुती हिंसाचारप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. करुणा आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहेत त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्या अंतर्गत पोटगी मिळण्यास पात्र आहेत असे निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले.
वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने माजी पॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना दणका देत घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी ठरवले तसेच पत्नी करुणा यांनी केलेले आरोप सपृतदर्शनी मान्य करत मुंडे यांना पत्नीला 1 लाख 25 हजारांची पोटगी व मुलगी शिवानी हिला 75 हजार रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत पत्नी व मुलीला दरमहा पोटगी देण्यास नकार देत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला सत्र न्यायालयात आव्हान दिले. मुंडे यांच्या अपिलावर शनिवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. मात्र सत्र न्यायालयानेही धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली. त्या आदेशाची प्रत नुकतीच प्राप्त झाली त्यात न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवत पोटगी नाकारण्याची मागणी फेटाळून लावली.