मुंबईत गेल्या काही दिवसांपासून धुरक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. प्रदूषणाने 20 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पश्चिम आशियातून येणाऱ्या धुळीच्या वादळाचा हा परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे बोरिवली, भायखळ्यामधील सर्व प्रकारची बांधकामे प्रकल्प तातडीने बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मुंबईत वाढत्या प्रदूषण पातळीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत सुमारे 286 ठिकाणी काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे.
याशिवाय प्रदूषणकारी भागात खोदकामांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नोटीस बजावूनही नियम न पाळल्यास एमआरटीपीनुसार अजामीनपात्र गुन्हा नोंदवला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.