‘टोरेस’चे हजारो गुंतवणूकदार गॅसवर, मालक गायब, पाच जणांवर गुन्हा

पोटाला चिमटा काढून पैन् पै जमा करून कुणी पाच हजार, कुणी दहा हजार तर कुणी लाखभर टोरेस नावाच्या कंपनीत गुंतवले. सुरुवातीला चांगला परतावा मिळाला. पण, अचानक पैसे येणे थांबले. त्यामुळे तणावाखाली आलेल्या गुतंवणूकदारांनी कंपनीच्या मुंबईतील दादर, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील कार्यालयंबाहेर आज गर्दी केली. या कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांची 13 कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले असून कंपनीचा मालक गायब आहे. दरम्यान संचालक आणि मॅनेजरसह पाच जणांविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी टोरेस ब्रँड चालवणाऱया प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनीचे संचालक, सीईओ व जनरल मॅनेजर अशा पाच जणांविरोधात बीएनएसच्या कलम 318 (4), 316 (5), 61 सह एमपी आयडी कायदा कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खार येथे राहणाऱया प्रदीप वैश्य या भाजीविव्रेत्याने केलेल्या तक्रारीवरून शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 21 जून 2024 ते 30 डिसेंबर 24 या कालावधीदरम्यान कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, सीईओ तौफिक रियाझ ऊर्फ जॉन कारटर तसेच जनरल मॅनेजर तानिया वॅसातोवा, स्टोर इन्चार्ज व्हॅलेंटिना कुमार यांनी संगनमताने त्यांच्याकडील मोजोनाईट हा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवलेल्या रक्कमेवर आठवडय़ाला दहा टक्केप्रमाणे परतावा देण्याचे आमिष दाखवले होते.

आठवड्याला 10 टक्के परतावा

कंपनी आठवडय़ाला 10 टक्के परतावा देत असे; पण गेल्या 2 दिवसांपासून कंपनीकडून काहीच माहिती मिळत नसल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले. कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेकांच्या छातीत अक्षरशः कळ गेली. अनेकांच्या घरात वादावादी झाली, तर अनेकजण प्रचंड तणावाखाली आले असे अनुभव अनेक गुंतवणूकदारांनी सांगितले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात कंपनीतील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादर येथील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमल्याने खबरदारी म्हणून मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.

ख्रिसमसपासून व्याजदर वाढवले

भरलेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम दर आठवडय़ाला गुंतवणूकदाराला मिळायची. मागील वर्षभरापासून कंपनी मुंबईतील विविध ठिकाणी कार्यरत आहे. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत होते; मात्र ख्रिसमसपासून कंपनीने अचानक व्याजदर वाढवल्याने अनेक गुंतवणूकदार आकर्षित झाले. त्यामुळे परिस्थिती कंपनीच्या हाताबाहेर गेली. कंपनीला अवाचेसवा व्याजदर देणे कठीण गेल्याचे एका गुंतवणूकदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. साखळी पद्धतीने हा कारभार चालत असे. त्यामुळेच कमी कालावधीत कंपनीने मोठय़ा प्रमाणावर लोकांना आकर्षित केले.

अशी होती परतावा मिळवण्याची प्रक्रिया

– कोणत्याही एजंटशिवाय टोरेस कंपनीशी ग्राहक जोडला जाऊ शकत नाही.
– कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन फोन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर गुंतवणूकदारांना सर्व माहिती पाहता येते. त्यासाठी सर्वप्रथम कार्यालयाला भेट द्यावी लागते.

गुंतवणूकदार काय म्हणतात…

-एका गुंतवणूकदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, 5 जानेवारी 2025 रोजी मित्राच्या सल्ल्याने 5,887 रुपये गुंतवले. या बदल्यात एक स्टोन मिळाला. 11 टक्के व्याजदरासह 13 जानेवारीला 606 रुपयांचा पहिला हप्ता मिळणार होता. यानुसार 52 हप्त्यांमध्ये त्याला 31,000 रुपये मिळणे अपेक्षित आहे.

-दादरचे रहिवाशी आणि टोरेसचे गुंतवणूकदार नवनाथ निर्गुणी यांनी 40,000 रुपयांची गुंतवणूक केली होती. 40 हप्त्यात 4-5 टक्क्यांनी परतावा मिळाल्याने रक्कम वसूल झाली. शिवाय त्यांना नफादेखील झाला. रक्कम भरल्यानंतर अमेरिकन हिरा मिळाला, ज्याची बाजारात काहीच किंमत नाही. कंपनीच्या अॅपमध्ये सर्व माहिती उपलब्ध असते. पैसे गुंतवताना कंपनीने बँक खात्यासह इतर कागदपत्रे घेतली. मग पासवर्ड तयार केला, पण दोन दिवसांपासून अॅप बंद आहे. त्यामुळे पैसे मिळतीलच याची शाश्वती नाही, असे निर्गुणी म्हणाले.

कल्याणमध्ये हंगामा; सानपाडय़ात कार्यालयावर दगडफेक

गुंतवणूकदारांनी आज कल्याणमधील खडकपाडा चौकातील टोरेस कंपनीच्या ऑफिसवर धडक दिली. मात्र कार्यालय बंद असल्याने गुंतवणूकदारानी हंगामा केला तर सानपाडय़ातील कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली.