मुंबईतील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईच्या वडाळा परिसरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली. वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजजवळ एका कारने चार वर्षाच्या मुलाला चिरडले. या अपघातात त्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण संदीप गोले (19) असे त्या आरोपीचे नाव आहे. भूषण विलेपार्ले येथे राहणारा असून तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भूषणला अटक केली आहे. तसेच अपघातातील लहान मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आयुष किनवडे असे मृताचे नाव आहे.
आयुष हा त्याच्या आई- वडिलांसोबत आंबेडकर कॉलेजजवळील फूटपाथवर राहायचा अशी माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. आरोपी भूषण गोले परिसरात यू टर्न घेत असताना आयुष गाडीच्या चाकाखाली आला. या अपघातात आयुषला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यासंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.