नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक मुंबईकर राज्याबाहेर फिरायला गेले आहेत. सुट्टीनिमित्त फिरायला गेलेल्या एका मुंबईकर पर्यटक महिलेचा हिमाचल प्रदेशमध्ये अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
मंडी येथील घाटरस्त्यात मोठी दरड कारवर कोसळून झालेल्या अपघातात मुंबईकर महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कारमध्ये असलेले अन्य दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले. ते मनाली येथे पर्यटनाचा आनंद घेऊन मुंबईच्या दिशेने माघारी येत होते. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघात घडला, त्या परिसरात बांधकाम सुरू होते. याचदरम्यान एका वळणावर कार आली असता, अचानक मोठा दगड कारवर येऊन कोसळला. यात कारचे प्रचंड नुकसान होण्याबरोबरच पर्यटक महिलेला प्राण गमवावा लागला. अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली. कारच्या उजव्या बाजूला दगड कोसळला. मंडी जिल्ह्यातील जंझेली भागातही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यात तीन वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.