#MumbaiRains मुंबई उपनगरात पावसाची दमदार हजेरी, सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात, नागरिकांची तारांबळ

mumbai rain

मुंबई आणि उपनगरात बुधवारी रात्री पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गुरुवारी पहाटे कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वे आणि हार्बरवरील वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. मात्र पाऊस असाच सुरू राहिल्यास त्याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दादरच्या काही सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाणी साचण्यास प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. रस्ते वाहतूक मंदावली.

मुंबईला येलो तर रत्नागिरीला रेड अॅलर्ट

दरम्यान, दक्षिण मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा असल्याने कुलाबा, फोर्ट, मलबार हिल, चर्चगेट आणि जवळपासच्या इतर भागात पुढील 2 तासांत मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकूण पाऊस 50-60 मिमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईला आज येलो, ठाणे-पालघरला ऑरेंज अॅलर्ट, तर रत्नागिरीला रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवी मुंबईत वाशी, जुईनगर, बेलापूर या भागात पावसाने पहाटेपासूनच चांगली हजेरी लावली आहे.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत देखील पावसानं जोर धरला असून इथे देखील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे.