मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; शीव, कुर्ला, घाटकोपरमधील भाग पाण्याखाली नालेसफाईची पोलखोल, रस्त्यावर खड्डेच खड्डे

=मुंबईत बुधवारी रात्रीपासून गुरुवारी दुपारपर्यंत कोसळलेल्या पावसाने मुंबई महापालिकेच्या 100 टक्के नालेसफाईच्या दाव्याची पूर्णपणे पोलखोल केली आहे. मुंबईतील सखल भागांसह शीवमधील गांधी मार्केट, कुर्ला येथील शीतल सिनेमा परिसर तर घाटकोपरमधील काही भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला. मुंबईसह पश्चिम उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे काही मुख्य रस्त्यांसह सर्व्हिस रोडचीही अक्षरशः चाळण झाली.

मुंबईत ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. त्यामुळे बेस्टला आपल्या मार्गात बदल करावे लागले तर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. स्थानकांवर गर्दी होऊन सकाळीच बाहेर पडलेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.

मिठी नदीला पूर

विहार तलाव भरून वाहू लागल्यामुळे त्याचे पाणी थेट मिठी नदीत घुसले. त्यामुळे मिठी नदीला पूर आला आणि मिठीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती 2.6 मीटरवर पोहोचली. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मिठी नदीला लागून असलेल्या क्रांतिनगरमधील काही रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले तर तिथे राहणाऱ्या रहिवाशांना माईकवरून सतर्कतेच्या सूचना देत सावधगिरी बाळगण्यास सांगितले गेले.

मुंबईसाठी शुक्रवार सकाळपर्यंत ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून ताशी 60 ते 70 किमी प्रतितास अशा वेगाने वादळी पाऊस होण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

पुरवणी पेपर पुढे ढकलले

‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे शुक्रवारी होणारे दहावी-बारावीचे पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता दहावीचे हे पेपर 31 जुलै रोजी तर 12 वीचे हे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहेत.

अंधेरी सब वे पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेमध्ये सहा ते सात फूट पाणी साचले आहे. या ठिकाणी पालिकेने उच्च क्षमतेचे पंप बसवले असले तरी या ठिकाणी पाणी तुंबल्याने वाहतूक बंद करावी लागली आहे. त्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

खेडमध्ये मुसळधार; जगबुडी इशारा पातळीच्या वर

बुधवारी रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. शहरातील मटण मार्केटजवळून शहरात पुराचे पाणी शिरले असून नदी किनाऱ्यावरील व्यापारी व नागरिक धास्तावले आहेत. शहराजवळ पावसाची संततधार नसली तरी जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराजवळ नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून खेड- दापोली मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.