चिंब ओली मुंबई! मुसळधार पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर परिणाम, चाकरमान्यांचे हाल

फोटो - गणेश पुराणिक

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी रात्री संततधार पडल्यानंतर शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला असून येत्या काही तासांमध्ये मुंबईत जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. अनेक भागांमध्ये रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू असून लोकलही उशिराने धावत आहेत.

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा जवळपास 10 ते 15 मिनिटं विलंबाने धावत आहे. त्यामुळे सकाळच्या शिफ्टला वेळेत पोहोचण्याची लगबग करणाऱ्या चाकरमान्यांना लेट मार्कचा शिक्का मिळत आहे. तसेच शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे.

शनिवार सकाळपासून मुंबईच्या आकाशामध्ये काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली आणि थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये पाणी साचू लागले. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला असून अंधेरी सब-वे बंद करण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी ट्राफिक जामची समस्या निर्माण झाली. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरातही कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे. यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्येही पाऊस तुफान बरसत आहे. हवामान विभागाने रत्नागिरीला रेड अलर्ट, तर रायगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

दरम्यान, पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचे चित्र दिसत आहे. विदर्भामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, नागपूरमध्येही पावसाने हजेरी लावली असून चंद्रपूर, भंडारा-गोंदियाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.