Mumbai Rain: पावसावेळी मॅनहोलमध्ये बुडून महिलेचा मृत्यू, तासाभरानंतर मृतदेह बाहेर

बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत असलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मॅनहोलमध्ये एका 45 वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला.

अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी परिसरात विमल गायकवाड (45) या सुमारे 100 मीटरपर्यंत वाहून गेल्या. सुमारे तासभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह सापडला, असे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यांना कूपर रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

बुधवारी मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले, सखल भागात पाणी साचले, उपनगरीय रेल्वे वाहतुकीसह लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक देखील थांबली. तर विमान वाहतुकीला देखील याचा फटका बसला असून मुंबईकडे येणारी किमान 14 उड्डाणे वळवावी लागली.

बुधवारी संध्याकाळी मुंबईतील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये मुलुंडमधील वीणा नगरमध्ये 104 मिमी, भांडुपमध्ये 120 मिमी, पवईमध्ये 145 मिमी, चेंबूरमध्ये 162 मिमी आणि गोवंडीमध्ये 167 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने (IMD) गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

बीएमसीने गुरुवारी शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.