मुंबईत मराठी माणसांवर अन्याय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारल्याची घटना मुंबईत घडली आहे. आमच्या कंपनीत मराठी मुले नको, अशी मुजोर भूमिका कंपनीच्या मालकाने घेतली आहे. मराठी पोरं आमच्याकडे कामाला योग्य नाहीत असं सांगत मुंबईतील राधेशाम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मराठी तरुणाला नोकरी नाकारल्याची घटना घडली. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. कंपनीच्या मालकाला दक्षिण मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख संतोष शिंदे ह्यांनी जाब विचारला. त्यानंतरही मालकाची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले. तसेच शिवसेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक्सवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
मराठी मुलं नोकरीत नकोत म्हणून मराठी तरुणांवर अन्याय करणाऱ्या मरिन लाईन्स येथील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला दक्षिण मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख संतोष शिंदे ह्यांनी जाब विचारला. pic.twitter.com/5spwUM73kk
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 4, 2025
मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्र्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मरीन लाईन येथील राधेशाम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला नोकरी नाकारली. मराठी मुलं आमच्या कामासाठी सूट होत नसल्याचं कंपनीच्या मालकाने सांगितलं. मराठी मुलं नोकरीत नकोत म्हणून मराठी तरुणांवर अन्याय करणाऱ्या मरिन लाईन्स येथील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला दक्षिण मुंबईतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख संतोष शिंदे ह्यांनी जाब विचारला. त्यांनी मालकाला जाब विचारत चांगलेच फैलावर घेतलं.
महाराष्ट्रात असून मराठी तरुणांना नोकरी नाकारता. मग महाराष्ट्रात धंदाच करू नका असं म्हणत संतोष शिंदे यांनी कंपनीच्या मालकाला चांगलेच फैलावर घेतलं. महाराष्ट्रात कंपनी सुरू करायची आणि मराठी मुलांनाच नोकरी नाकारायची हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावेळीही कंपनीच्या मालकाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. मराठी मुलं आमच्या कंपनीला सूट होत नाहीत. ते दोन चार दिवसात नोकरी सोडून जातात अशी त्यांनी भूमिका कायम ठेवली.