मुंबई-पुणे टॅक्सी स्टॅण्ड वाद हायकोर्टात, भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे आदेश

मुंबई ते पुणे धावणाऱ्या टॅक्सी वडाळा येथे थांबवल्या जात असून या टॅक्सी स्टँडला येथील रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. परिसरात बेकायदेशीर पद्धतीने वाहने लावण्यात येत असल्याचा दावा रहिवाशांनी केला असून या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने याचिकेची दखल घेत राज्य सरकारला दोन आठवडय़ांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईतून पुण्याला धावणाऱ्या टॅक्सी दादर येथील पुलाखालून मार्गस्थ होत असत. त्या ठिकाणी त्यांना जागा देण्यात आली होती. कालांतराने ही जागा राज्य सरकारने ताब्यात घेतली व टॅक्सी चालकांना पी.बी. सुळे रोड, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या मागच्या बाजूस जागा देण्यात आली. सरकारने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेताच जागा दिली. त्यामुळे परिसरात गजबज वाढली असून त्याचा परिणाम निसर्गावर होत असल्याचा दावा करत वडाळा वेस्ट सिटीझन पह्रमच्या वतीने हायकोर्टात मुंबई-पुणे टॅक्सी ऑनर्स असोसिएशन व इतरांविरोधात याचिका दाखल केली या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याप्रकरणी सरकारी वकिलांनी संबंधित विभागाकडून माहिती घेतली जाईल व न्यायालयाला दिली जाईल, असे खंडपीठाला सांगितले व सुनावणी तहकूब केली.