व्यापार प्रमाणपत्रन मिळवलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम, मुंबई, पुणे आरटीओअंतर्गत 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई

केंद्रीय मोटार वाहन कायदा आणि नियम 1989 अंतर्गत व्यापार प्रमाणपत्र न मिळवलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. सध्या मुंबई आणि पुणे आरटीओअंतर्गत व्यापार प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या 36 वाहन विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. परिवहन विभाग आता संपूर्ण राज्यभर ही कारवाई तीव्र करणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक व उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किंवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ठ प्रतिष्ठान, शोरूम किंवा डीलरशीप यांनी नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्यापार प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या वाहन वितरक व उत्पादकांनी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 192 नुसार दंडास पात्र असणार आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहन तपासणीसाठी संपूर्ण राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे दंडात्मक कारवाईच्या भीतीने वाहन विव्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

– सध्या प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरिवली व पुणे या कार्यालयांअंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवून व्यापार प्रमाणपत्र न मिळवलेल्या 36 वाहन विव्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून 34 वाहने जप्त करण्यात आली आहेत. संपूर्ण राज्यभर याच धर्तीवर कारवाई केली जाणार आहे.