मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरचा प्रवास ‘मृत्यूची वाट’ ठरत आहे. खालापूर ते महड फाटा या तीन किलोमीटरमध्ये जवळपास एक हजार खड्डे असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दिवसाला किमान 10 अपघात होत आहेत. खालापूरपासून खोपोली आणि बोरघाटपर्यंत प्रवास करताना वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन असतात. असे असतानाही एमएसआरडीसी, आयआरबी टोल प्रशासन ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खालापूर ते खोपोली बोरघाटपर्यंत चौपदरीकरणाचे काम चार वर्षांपूर्वी झाले. मात्र एमएसआरडीसी व आयआरबी कंपनीच्या वादात खालापूर ते शासकीय दूध डेअरी या सहा किमी अंतरामधील रस्त्याचे काम रखडले आहे. सतत चार वर्षे या राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास खड्यातून होत आहे. खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात येत असून ही उपाययोजनाच अपघातांना निमंत्रण ठरत आहे. मार्गावर टाकलेले दगडगोटे व माती मार्गावर येत असून वाहने घसरून सातत्याने अपघात घडत आहेत. वाहनचालक व खालापुरातील नागरिकांना मार्ग दुरुस्तीसाठी वारंवार आंदोलने करावी लागत आहेत.
इगल इन्फा. या रस्ते विकास कंपनीने केलेले काम निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षातून दोन वेळा मार्गावरील खड्डे भरावे लागत आहेत. तसेच दुभाजकही मनमानी पद्धतीने बनविलेले असल्याने दुभाजकांना धडकून अपघात घडत आहेत. खालापूर-खोपोली अंतरावर कुठेही दिशादर्शक फलक नाहीत, साईडपट्टीही नाही, लेन दुभाजक मार्किंग नसल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावर एक हजाराहून अधिक खड्डे आहेत. हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असून शेकडो प्रवासी जायबंदी झाले आहेत, तर वर्षभरात 50 हून अधिक जणांना खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला आहे.
बेकायदा बांधकामे वाढली
राज्य रस्ते महामंडळाला रस्ता का हस्तांतर केला नाही, अशी विचारणा आयआरबीचे अधिकारी अनिल धायगुडे यांनी सांगितले की, एमएसआरडीसीच्या पथकाने खालापूरमध्ये येऊन मार्गाची पाहणी केली असून मार्ग हस्तांतरणाबाबत कार्यवाही सुरू आहे. हायवेलगतच्या अतिक्रमणाचे आम्ही सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. हस्तांतरण होताच यावर कारवाई करण्यात येईल.
18 महिन्यांचे काम चार वर्षे रखडले
मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे खालापूर ते खोपोली बोरघाट पायथा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ चे २०१६ मध्ये १८ महिन्यांच्या मुदतीत रस्ता रुंदीकरण करायचे होते, परंतु मुदतीनंतरही एक वर्ष काम सुरू होते तरीही मार्ग सुस्थितीत झाले नसल्याने मागील चार पावसाळे खालापूर ते खोपोली शासकीय दूध डेअरी अशा अंतरावर एक हजारच्या आसपास खड्डेच खड्डे पडले असल्याने वाहनांच्या अपघातामध्ये वाढ झाली आहे.