मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताना लोणावळा, खंडाळा आता विसरा; प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प चार महिन्यात पूर्ण होणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून सप्टेंबर महिन्यात हा प्रकल्प तडीस लागणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवरून जाताना लोणावळा, खंडाळा आता विसरावे लागणार आहे. दरम्यान, पावसाळ्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ जवळपास अर्ध्या तासाने कमी होणार आहे. त्यामुळे इंधनाबरोबरच हजारो प्रवाशांसह वाहनचालकांचा वेळही वाचणार आहे.

देशभरात वाहतूक कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. त्याचबरोबर अपघाताचे प्रमाणदेखील कमी होणार आहे. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सप्टेंबर 2025 पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. मुंबई, पुणे यांच्यातील प्रवास अधिक सोपा व जलद करण्याच्या उद्देशाने हा केबल ब्रीज उभारला जात आहे. हा मार्ग 13.3 किमी लांबीचा असून यामुळे खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटदरम्यानचे अंतर कमी होईल.

नव्या मार्गामुळे सध्याच्या 19.8 किलोमीटर अंतरात 5.7 किलोमीटरची बचत होणार आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) देखरेखीखाली हा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे 6 हजार 600 कोटी रुपये आहे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून सप्टेंबर 2025 पासून या मार्गावर वाहतूक सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोनामुळे लटकंती

नवीन मार्गाचा उपयोग केल्यास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांचा सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचेल. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र कोरोना महामारीच्या काळात काम ठप्प झाल्याने प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता त्याचे काम पूर्ण होण्यासाठी अतिरिक्त वेळ लागणार आहे.