![Ravindra Natya Mandir 3](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Ravindra-Natya-Mandir-3-696x424.jpg)
मुंबईकर कलारसिकांचे कलामंदिर समजल्या जाणाऱ्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिराच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. रवींद्र नाट्यमंदिराचे काम फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होऊन मार्च महिन्यात नाट्यमंदिराचा पडदा उघडणार आहे. मुंबईकर कलारसिकांची पंढरी पुन्हा गजबजणार आहे.
सध्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अकादमीच्या वास्तूला नवा साज चढवण्यात येत असून मराठी कला-संस्कृती आणि नाट्य-परंपरेचा वारसा विचारात घेऊन त्यानुसार या वास्तूची सजावट करण्यात येत आहे. डॉल्बी साऊंड सिस्टिम, आरामदायी आसन व्यवस्था आणि सुसज्ज अशा मेकअप रूमसह मुख्य व मिनी थिएटर कला सादरीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अॅम्फी थिएटर, कलादालन आणि इतर दालनेसुद्धा अत्यंत देखण्या स्वरूपात उभारली जात आहेत, तर बाहेर छोटे खुले नाट्यगृह तयार करण्यात येत आहे. येत्या काळात पु. ल. अकादमीत नवनवीन काौशल्य विकासआधारित कोर्सेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन आहे.
केवळ सांस्कृतिक कार्यक्रम वा नाटकच नव्हे तर रवींद्र नाट्यमंदिरात चित्रपटही आता पाहता येतील. त्यादृष्टीने मिनी थिएटर, मोठी एलईडी स्क्रिन व सिनेमासाठी आवश्यक असणारी डॉल्बी साऊंड सिस्टिमसुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून नाट्य, चित्रपट कलावंत आणि प्रेक्षकांसाठी रवींद्र नाट्यमंदिर फेब्रुवारी अखेरपर्यंत किंवा मार्चमध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचे समजते.