पोलिसांनी वाचवले 1.31 कोटी रुपये

अनेक प्रलोभने दाखवून नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या सायबर ठगांना मुंबई पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी चांगला दणका दिला.

गेल्या 24 तासांत ठगाने कोटय़वधी रुपयांची फसवणूक केली. पश्चिम सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये वाचवले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सायबर ठग हे फसवणुकीसाठी रोज नवी युक्ती शोधून काढतात. कधी डिजिटल अटक, तर कधी शेअर ट्रेडिंगमध्ये आयपीओ, तर कधी सीबीआय अधिकारी, ईडी अधिकारी असल्याचे भासवून कारवाईची भीती दाखवून पैसे उकळतात. गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुह्याच्या फसवणुकीचा आलेख वाढतच चालला आहे. व्हॉट्सअॅपवर बनावट प्रोफाईल बनवून ठगाने काही जणांना पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले होते. फसवणूक प्रकरणी पश्चिम सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. उपनिरीक्षक मंगेश भोर,  बावस्कर, माने, पाटील, राऊळ, वालवलकर आदी पथकाने तपास सुरू केला. फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले, त्या खात्याची माहिती काढली. त्यानंतर संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांना संपर्क करून ती रक्कम गोठवली. ती रक्कम आता संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.