Maharashtra Election 2024 – मुंबईत ट्रकमधून 80 कोटींची चांदी जप्त, मतदानाच्या चार दिवस आधी मोठी कारवाई

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी 20 तारखेला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी प्रचार सभांनी धुरळा उडणार आहे. अशातच सतर्क असलेल्या निवडणूक आयोगाच्या पथकाने मतदानाच्या चार दिवस आधी मोठी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एका ट्रकमधून 80 कोटी रुपये किमतीची चांदी जप्त केली आहे.

निवडणूक आगोयाच्या पथकाने केलेल्या कारवाईत एका ट्रकमधून 8476 किलो चांदी जप्त केली आहे. या चांदीची किंमत तब्बल 80 कोटी रुपये आहे. मानखुर्द पोलीस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना शुक्रवारी रात्री हे घबाड पकडण्यात आले. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी आढळून आली.

पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी ट्रकमधून जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. तसेच चौकशीसाठी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.