धक्कादायक! गस्तीचे क्यूआर कोड स्टिकर गायब

मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 2020 साली मुंबई पोलिसांसाठी हायटेक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला होता. मुंबईतील विविध संवेदनशील भागात पॅट्रोलिंगसाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात आला होता, परंतु अवघ्या पाच वर्षांत या हायटेक व्यवस्थेकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याची बाब समोर आली आहे. ज्या ठिकाणी पॅट्रोलिंगसाठी क्यूआर कोडचे स्टिकर लावले होते. ते स्टिकर आता तेथून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मुंबई पोलिसांच्या पेट्रोलिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मुंबईतील अनेक संवेदनशील भागात पॅट्रोलिंगसाठी क्यूआर कोडचे स्टिकर लावण्यात आले होते. डय़ुटीवर असलेला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन क्यूआर कोड स्कॅन करत असत. त्यामुळे त्या भागात पेट्रोलिंग करण्यात आल्याची माहिती मिळत होती. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर डेटाची पोलीस विभागाच्या सिस्टममध्ये नोंद होते. कोणत्या पोलीस कर्मचाऱयाने पेट्रोलिंग केले, कधी केले आणि किती वाजता केले, याची संपूर्ण माहिती एका क्षणात मिळत होती. परंतु, आता मुंबईतील अनेक भागात लावलेले क्यूआर कोडचे स्टिकर गायब झाल्याने पोलिसांना स्पॅन करणे अवघड होत आहे. क्यूआर कोड स्पॅन करण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी जावेच लागते, परंतु स्टिकर नसल्याने पोलीस घटनास्थळी जातात की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. मुंबईतील एकूण 94 पोलीस स्टेशनच्या प्रत्येक वरिष्ठ निरीक्षक पोलीस क्षेत्रात 60 संवेदनशील स्थानांवर क्यूआर कोड लावण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले होत़े

या ठिकाणाहून गायब झाले स्टिकर्स

चारकोपमधील सेक्टर 7 येथील महापालिकेच्या मैदानात लावलेले क्यूआर कोड गायब झाले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी या ठिकाणी पहिल्यासारखे येताना दिसत नाही, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. कांदिवलीतील सम्राट अशोक चक्रवर्ती रोड परिसरातील क्यूआर कोड गायब झाल्याने पोलीस या ठिकाणी कधी-कधी येत आहेत. गोरेगावच्या मोतीलाल नगरचे हडकमाता मंदिर रोडवरील क्यूआर कोड स्टिकर दिसत नाहीत. त्यामुळे आता या ठिकाणी नियमितपणे पोलीस कर्मचारी येत नाहीत. संजय गांधी नॅशनल पार्पमधील चहारदिवारी क्यूआर कोड स्टिकर हटल्याने पोलीस आधीसारखे दिसत नाही, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

तीन विभागांत क्यूआर कोडचे पॅट्रोलिंग

ए, बी, सी अशा तीन विभागांत क्यूआर कोडची पॅट्रोलिंग केली जाते. एमध्ये प्रत्येक दोन तासाला पॅट्रोलिंग करावी लागते. बीमध्ये दिवसात एकदा पोलीस कर्मचाऱयांना घटनास्थळी जावे लागते, तर सीमध्ये आठवडय़ात एकदा घटनास्थळी जाऊन पॅट्रोलिंग करणे आवश्यक आहे.