
नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी शहर आणि उपनगरातील काही भागांत रुट मार्च काढत यंत्रणा सतर्क असल्याची ग्वाही दिली. काही भागांत दंगलीचे मॉकड्रिलही घेण्यात आले.
घाटकोपरच्या चिरागनगर, आझाद नगर, पारशीवाडी आदी संवेदनशील भागात मुंबई पोलिसांनी रुट मार्च काढला. डीसीपी विजयकांत सागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी या रुट मार्चमध्ये सहभागी झाले होते. मरोळ माफखान नगर भागात दंगलीचे मॉकड्रिल करण्यात आले. दंगल झाल्यास ती कशी आटोक्यात आणायची याचे प्रात्यक्षिक यावेळी केले गेले. पोलिसांना यात स्थानिकांनी साथ दिली. राज्य राखीव पोलीस, एमएसएफचे जवान यांचाही यात सहभाग होता.
सायबर विभाग सतर्क
नागपूरच्या घटनेची दखल घेत राज्य सायबर विभागानेदेखील सोशल मीडियावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱयावर थेट कारवाईचा इशाराच सायबर पोलिसांनी दिला होता. सायबर सेल सीसीटीव्ही, मोबाईल फुटेज, मीडिया फुटेज, सोशल मीडिया पोस्ट, सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचा डाटा बेस तयार करत आहे.
नागपुरातील संचारबंदी उठवली
नागपुरात सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी काही भागांत संचारबंदी लागू केली असल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. आज सातव्या दिवशी संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली, मात्र संवेदनशील भागांत बंदोबस्त कायम ठेवला आहे.