नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात

नवीन वर्ष अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले आहे. यातच शहरात कायदा आणि सु-व्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाली आहे. नववर्षागमन निमित्ताने महत्वाची सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, शॉपिंग मॉल यांसारख्या आस्थापनांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात व नागरिक जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करतात. यातच नववर्ष आगमनानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलं आहे.

नागरिकांना नववर्ष आगमन सुरक्षितपणे आणि निर्विघ्नपणे साजरा करता यावे याकरीता मुंबई पोलीस दलाकडून वाहतुक विभागासह 8 अपर पोलीस आयुक्त, 29 पोलीस उप आयुक्त, 53 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 2184 पोलीस अधिकारी व 12048 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यांचेसोबत महत्वाच्या ठिकाणी एस.आर.पी.एफ. प्लाटून, क्युआरटी टिम, बीडीडीएस टिम, आरसीपी प्लाटून, होमगार्डस् असा चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच 31 डिसेंबर रोजी मुंबई पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात येणार असून गर्दीच्या ठिकाणी गस्त/फिक्स पॉईंट बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन व “ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह” विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येणार असून विविध आस्थापना व गुन्हेगारांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

मद्य पिऊन वाहन चालवणारे व्यक्ती, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणारे व्यक्ती, महिलांशी गैरवर्तवणूक करणारे व्यक्ती, अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्या आस्थापना, अंमलीपदार्थ विकी/सेवन यासारखी बेकायदेशीर कृत्य करणारे व्यक्ती यांचे विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवून नववर्ष आगमन उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे, असे आवाहन मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आलं आहे.