इजिप्तच्या पर्यटकांचे मुंबई पोलिसांनी मन जिंकले, मायदेशात परतण्यापूर्वी सुखद धक्का

इजिप्तचे नागरिक असलेले अहमद आणि त्यांच्या पत्नीला मुंबई पोलिसांनी आज सुखद धक्का दिला. मायदेशात परतण्यासाठी काही तास शिल्लक असताना त्यांचा पासपोर्ट, चार हजार अमेरिकन डॉलर्स उबर कारमध्ये ते विसरले, पण एल टी मार्ग पोलिसांनी झटपट कारवाई करत अहमद यांचा पासपोर्ट आणि रोकड परत मिळवून दिली. मुंबई पोलिसांच्या या कार्यतत्परतेने आमचे मन जिंकले अशी प्रतिक्रिया अहमद याने ट्वीट करून दिली आहे.

अहमद आणि त्यांची पत्नी हिंदुस्थानात सुट्टीचा आनंद लुटायला आले होते. आपला हॉलिडे मस्त एन्जॉय केल्यानंतर दोघेही आज मायदेशात परतणार होते. विमान पकडण्यासाठी काही तासांचा अवधी असताना दक्षिण मुंबईत ते उंबर कारमध्ये त्यांचा पासपोर्ट, चार हजार अमेरिकन डॉलर आदी दस्तऐवज विसरले. हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ एल टी मार्ग पोलिसांशी संपर्क साधला. याची तत्काळ दखल घेत सपोनि प्रशांत कांबळे, समीर परूळेकर, प्रसाद शिंदे व पथकाने उबर चालकाचा शोध सुरू केला आणि काही क्षणांत त्या चालकाला शोधून त्याला बोलावून घेतले. चालक गुलाम हादेखील अहमद यांचे कारमध्ये विसरलेले सर्व सामान घेऊन तातडीने पोलिसांकडे हजर झाला. पोलिसांची कार्यतत्परता आणि चालक गुलाम याचा प्रामाणिकपणा आम्हाला खूप भावला. अविस्मरणीय क्षण आम्ही सोबत घेऊन जात आहोत अशा शब्दांत अहमदने ट्विटद्वारे कौतुक केले आहे.