सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून 3 लाख मुंबईकरांचा घात करणाऱया टोरेस कंपनीने नवीन वर्षानिमित्त खास स्कीम आणली होती. सुरुवातीला 4 टक्केचा 6 टक्के परतावा देणारी कंपनी नवीन वर्षात तब्बल 11 टक्के परतावा देणार या कल्पनेने 1 ते 5 जानेवारी दरम्यान लाखो मुंबईकरांनी गुंतवणूक केली आणि तिथेच घात झाला. ही ऑफर प्रचंड महागात पडली. अचानक परतावा मिळणे बंद झाले आणि 6 जानेवारीला भामटय़ांनी आपले दुकान बंद केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून युव्रेनची व्हिक्टोरिया कोवालेन्को तसेच सीईओ तौफीक रियाझ हे मात्र पसार झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणाला तोंड फुटल्यानंतर प्लॅटिनम हर्न प्रा.लि. कंपनी आणि कंपनीच्या संचालकासह पाज जणांविरोधात शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच तत्काळ सायबर पोलिसांची मदत घेऊन कंपनीची तीन बँक खाती गोठवली.
शासकीय अधिकारी, कर्मचारीही फसले
चांगला पगार असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारीदेखील कंपनीच्या जाळ्यात सापडले. झटपट व चांगला परतावा मिळविण्याची लालसा त्यांना महागात पडली आहे.
व्हिक्टोरिया आणि तौफीकचे पलायन
पाच तारखेपर्यंत भामटय़ांनी शक्य होईल तितका पैसा लोकांकडून गुंतवून घेतला. अखेर 6 तारखेला फसवणुकीचा धंदा थांबला. पण असे होणार हे ठाऊक असल्याने व्हिक्टोरिया आणि तौफीक यांनी आधीच पोबारा केल्याचे सांगण्यात येते.
ई-मेल आल्यानंतरही कारवाई नाही
फसवणुकीबाबत सीए असलेल्या अभिषेक गुप्ता यांनी ई-मेलद्वारे पोलीस आयुक्तालयाला कळविले होते. पण काहीच हालचाल न झाल्याने गुप्ता यांनी आयुक्तालय गाठून काही अधिकाऱयांना त्याबाबत सांगितले. तरीदेखील काहीच अॅक्शन घेतली गेली नाही, असे बोलले जात आहे. महिनाभर आधी पोलिसांना या भामटय़ांच्या कृत्याची कुणकुण लागली होती. पण काहीच पाऊल उचलले गेले नाही, अशीही चर्चा गुंतवणूकदारांमध्ये केली जात आहे.
महाविद्यालयीन तरुणांचीही गुंतवणूक
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील जमेल तितकी रोकड जमा करून टोरेसमध्ये गुंतवली. अशा अनेक तरुणांचे अर्ज पोलिसांकडे आले आहेत. 5 तारखेला तर 11.5 टक्के केल्याने शेवटच्या क्षणापर्यंत लोकांनी भरभरून गुंतवणूक केली.
भाईंदरमध्ये पाच बँक खाती गोठवली
टोरेस कंपनीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 52 जणांचे तक्रार अर्ज पोलिसांकडे आल्यानंतर कंपनीचे वेगवेगळ्या बँकेतील पाच बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यामध्ये एकूण 8 कोटी 77 लाख रुपये जमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवघरमधील रामदेव पार्क येथे टोरेस नावाचे ज्वेलरीचे दुकान सुरू करण्यात आले. आतापर्यंत 43 जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून यामध्ये एकूण 68 लाख 11 हजार 733 रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी सांगितले.
700 गुंतवणूकदारांचे अर्ज
शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सातशे गुंतवणूकदारांचे तक्रार अर्ज दाखल झाले. आजही मोठय़ा संख्येने गुंतवणूकदार पोलीस ठाण्यात आले होते. टोरेसच्या कार्यालयाबाहेरही लोकांची गर्दी कायम असून पोलीस त्यांना मदत करत आहेत.