
आयपीएस अधिकारी सुधाकर पठारे यांचे तेलंगणा येथे अपघाती निधन झाले. पठारे देवदर्शनासाठी तेलंगणात गेले होते. श्रीशैलम येथून नागरकुरलूनकडे जात असताना त्यांची कार आणि ट्रक यांच्यात धडक झाली. त्यात पठारे आणि त्यांच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. पठारे हे मुंबईत बंदर परिमंडळाचे उपायुक्त होते.
लवकरच सुधाकर पठारे यांना डीआयजीपदी पदोन्नती मिळणार होती. अलीकडेच वरिष्ठ डीसीपी म्हणून त्यांना सिलेक्शन ग्रेड मिळाली होती. त्यामुळे ते ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. दरम्यान, एका नातेवाईकासह ते ज्योतार्लिंगाच्या दर्शनासाठी कारने जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. समोरून येणारा ट्रक आणि पठारे यांची कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात पठारे आणि त्यांच्या नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.
पठारे हे स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग-1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलीस खात्यातच ते रमले. त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली होती. अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे पठारे यांनी सेवा बजावली होती.