अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. हल्ला झाल्यापासून तो फरार होता. अखेर 72 तासानंतर त्याला कासारवडवली भागातील हिरानंदानी लेबर कॅम्पमधून अटक करण्यात आली. मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद (वय – 30) असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
16 जानेवारीला सैफ अली खान याच्या घरात आरोपी जबरी चोरीच्या उद्देशाने घुसला होता. यावेळी आरोपीने सैफवर धारधार चाकूने वार केले होते. या प्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांची 30 पथकं आरोपीच्या मागावर होती. मात्र 72 तासांपासून तो पोलिसांनी गुंगारा देत होता. अखेर ठाण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याला वांद्र्यातील होली डे कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहितीही मुंबई पोलिसांनी दिली.
मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद हा आरोपी चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसला होता. तो मूळचा बांगलादेशचा रहिवासी असल्याचा संशय आहे. त्याच्याकडे हिंदुस्थानी नागरिकत्वाचा एकही सबळ पुरावा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी मोहम्मद शरीफूल हा विजय दास नावाने वावरत होता. पाच-सहा महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता. काही दिवस तो मुंबईत राहिला होता. एका हाउसकिपींग एजन्सीमध्ये काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.