
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटींचा घपला आज उजेडात आला. बँकेचा महाव्यवस्थापक आणि लेखाप्रमुख हितेश मेहता यानेच तिजोरीवर डल्ला मारला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आज अटकेची कारवाई केली. दरम्यान, 122 कोटींचा अपहार झाला त्याची जबाबदारी मी घेतो. मला वेळ द्या, सर्व पैसे परत आणून देतो, अशी विनवणी मेहता याने पोलिसांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यू इंडिया को-ऑप. बँकेवर कालच रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले. त्यानंतर बँकेच्या ठेवीतील 122 कोटींचा अपहार झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या अपहार प्रकरणात न्यू इंडिया सहकारी बँकेचा जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ अकाऊंट्स हितेश मेहता व अन्य अज्ञात आरोपींचा हात असल्याची तक्रार बँकेचे एक्टिंग चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देवर्षी शिशिर कुमार घोष यांनी दादर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण पुढील कारवाईसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहिसर येथील घर गाठून मेहताला चौकशीसाठी पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात आणले. चौकशीदरम्यान मेहता याने 122 कोटींच्या अपहाराची जबाबदारी स्वीकारली. शिवाय ही सर्व रक्कम मी परत आणून देईन, असेही मेहता चौकशीवेळेस म्हणाला. त्यामुळे पोलिसांनी संध्याकाळी वैद्यकीय तपासणी करून त्याला बेडय़ा ठोकल्या. मेहताला रविवारी सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात येईल.
गुन्हा दाखल होताच एलओसी जारी
मेहता व अन्य आरोपींविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपी परागंदा होऊ नये याकरिता त्याच्याविरोधात एलओसी जारी केली. पण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मेहताला त्याच्या दहिसर येथील घरातून चौकशीला नेले.
प्रभादेवी, गोरेगाव शाखेतील तिजोरीतील रकमेचा अपहार
बॅकेचे मुख्य कॉर्पोरेट कार्यालय प्रभादेवी येथे आहे. तसेच प्रभादेवी आणि गोरेगाव शाखेत तिजोऱया आहेत. या दोन्ही ठिकाणच्या तिजोऱयांमधील 122 कोटींची रक्कम कमी आढळून आली आहे. हा पैसा मेहता व अन्य आरोपींनी कुठे ठेवलाय, कुठे गुंतवलाय की अजून काही केलेय याचा शोध पोलीस घेत आहेत. शिवाय तिजोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, आवक -जावक रेकॉर्ड आधी बाबी पोलीस तपासणार आहेत.
बाहेरच्या बाहेर रोकड लंपास
मेहताकडून गोरेगाव शाखेतील रक्कम प्रभादेवी शाखेत घेऊन जाण्यास सांगितले जायचे, तर कधी प्रभादेवी शाखेतील रक्कम गोरेगाव शाखेत घेऊन येण्यास सांगितले जायचे. पण ती रक्कम एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी जाण्याऐवजी बाहेरच्या बाहेर लंपास केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कांडात मेहताबरोबर आणखी कोणाकोणाचा हात आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.
रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक?
न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील 122 कोटींची रक्कम गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ही रक्कम आरोपींनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवली असण्याची दाट शक्यता पोलिसांना आहे. शिवाय यात काही बडय़ा लोकांचा सहभाग असण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तसेच पोलीस मेहताच्या बँक खात्यांची तसेच अन्य ठिकाणांची झाडाझडती घेणार आहेत.
12 तारखेला घपला आला समोर
प्रभादेवी व गोरेगाव येथील बँकेच्या शाखेतील तिजोऱयांमधील 122 कोटींचा अपहार झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेला मिळाली. त्यामुळे आरबीआयने यांची गंभीर दखल घेत 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही ठिकाणच्या तिजोऱयांची तपासणी केली. त्यावेळी 122 कोटी रक्कम कमी असल्याचे आढळून आले. तेव्हा ही रक्कम कमी असण्याला मी जबाबदार आहे अशी कबुली हितेश मेहता याने आरबीआय व न्यू इंडिया बँकेच्या अधिकाऱ्यांपुढे दिली. त्यामुळे मेहतावर फौजदारी कट रचून पैशांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
क्लर्क ते जनरल मॅनेजर
58 वर्षांचा हितेश मेहता 1987 साली क्लर्क म्हणून बँकेत रुजू झाला होता. तेव्हापासून विविध पदांवर काम करत मेहता सध्या जनरल मॅनेजर आणि हेड ऑफ अकाऊंट्स पदावर काम करत होता. येत्या ऑक्टोबर महिन्यात मेहता सेवानिवृत्त होणार होता.