मुंबई निर्णायक विजयाच्या उंबरठ्यावर; विजयापासून केवळ पाच विकेट दूर

श्रेयस अय्यरचे झंझावाती द्विशतक आणि सिद्धेश लाडच्या दीडशतकाच्या जोरावर 602 धावांचा डोंगर रचून विजयाचा पाया रचणाऱ्या मुंबईने ओडिशाचा पहिला डाव 285 धावांत गुंडाळत फॉलोऑन लादला आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही तिसऱ्या दिवसअखेर पाहुण्यांची 5 बाद 126 अशी अवस्था करत रणजी मोसमातील दुसऱ्या निर्णायक विजयाच्या दिशेने धाव घेतली आहे. ओडिशाचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आणून मुंबई डावाचा विजयासह 7 गुणांसाठी सज्ज झाला आहे.

दुसऱ्या डावातही ओडिशा अडचणीत अनुराग सारंगी (6) आणि स्वास्तिक समळ (1) हे सलामीवीर 19 धावांतच बाद झाल्यामुळे ओडिशा पुन्हा अडचणीत सापडली. आशीर्वाद स्वाईन (ना. 46) आणि संदीप पटनायकने (39) 56 धावांची भागी रचली, पण सकाळी शतक साजरे करणारा संदीप दुसऱ्या डावात दीर्घ खेळी करू शकला नाही. हिमांशू सिंगने कर्णधार गोविंदा पोद्दार आणि बिप्लब समांत्रय यांचीही विकेट घेत ओडिशाचा पराभव निश्चित केला. रणजी सामन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईला केवळ पाच विकेटची गरज असून ते पहिल्या सत्रातच सामना संपवण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे ओडिशाला डावाचा पराभव टाळण्यासाठी अजून 191 धावांची गरज आहे. एवढेच नव्हे तर सामना अनिर्णित राखण्यासाठी त्यांना शेवटच्या दिवसाची 90 षटके फलंदाजी करावी लागेल, जे सध्यातरी अशक्य वाटतेय. त्यामुळे मुंबई बोनस गुणासह म्हणजेच डावाने विजय मिळवणार हे जवळ जवळ निश्चित आहे.

मुलानीने ओडिशाला गुंडाळले

काल मुंबईने ओडिशाचा अर्धा डाव गारद करून त्यांच्यावर फॉलोऑनचे संकट लादले होते. आज शम्स मुलानीने संदीप पटनायकला शतकानंतर ताबडतोब त्रिफळाचीत केले. संदीपने 102 धावांची तडाखेबंद खेळी करत आपले पाचवे प्रथम श्रेणी शतक साजरे केले. तो बाद झाल्यावर देबब्रत प्रधान (45), आशीर्वाद स्वाइन (37) आणि हर्षित राठोड (23) यांनी तळाला उपयुक्त फलंदाजी करत संघाची धावसंख्या 285 पर्यंत ताणली. काल दोन विकेट घेणाऱ्या मुलानीने आणखी 4 विकेट मिळवत 116 धावांत 6 विकेट टिपल्या. त्यामुळे चहापानाच्या आधीच ओडिशावर फॉलोऑनची नामुष्की लादली. पहिल्या डावात 317 धावांची जबरदस्त आघाडी घेणाऱ्या मुंबईने ओडिशाच्या दुसऱ्या डावातही पाच विकेट बाद केले.