दादरमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला बेड्या

किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना दादर परिसरात घडली. चंदन असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मनोज सहारेला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

गेल्या आठवड्यात ही घटना दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात घडली. शुक्रवारी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक गस्त करत होते. तेव्हा पोलिसांना एक जण बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांचे पथक तेथे गेले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तपासासाठी एक पथक तयार केले. पोलिसांनी तपासादरम्यान मृताची माहिती काढली. त्याचे नाव चंदन असल्याचे समोर आले. चंदनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजवरून पोलिसांनी मनोज सहारेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चंदनच्या हत्येची कबुली दिली. गुरुवारी रात्री चंदन आणि मनोजचा वाद झाला होता. त्या वादातून मनोजने चंदनची दगडाने ठेचून हत्या केली होती.