लोकल ट्रेनमधील गर्दीतून पडल्याने मृत्यु झालेल्या तरुणाच्या पालकांना मुंबई उच्च न्यायालयाने 4 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. न्यायाधिकरणाने रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे तसेच रेल्वे तिकीट नसल्याच्या कारणावरून भरपाई नाकारली होती. मात्र न्यायालयाने रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा निर्णय रद्द करत ही भरपाई मंजूर केली.
नासिर अहमद खान असे तरुणाचे नाव असून तो वडाळा ते चिंचपोकळी असा मासिक पासवर नियमित प्रवास करत असे. 8 मे 2010 रोजी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून नासिर खाली पडला. त्याला बेशुद्ध अवस्थेत जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पालकांनी रेल्वे दावा न्यायाधिकरणाकडे दाद मागत भरपाई मागितली होती. न्यायाधिकरणाने नासिरच्या पालकांचा दावा फेटाळून लावला होता. न्यायाधिकरणाने खान हा वैध प्रवासी होता का? यावरच शंका उपस्थित केली होती. तसेच अपघाताबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांना तात्काळ तक्रार न करणे आणि रेल्वे तिकीट नसणे यावरून भरपाई मंजूर करण्यास नकार दिला होता.
रेल्वे दावा न्यायाधिकरणाच्या निर्णयाला खानच्या पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांनी निर्णय सुनावला. खान हा खरोखरच लोकल ट्रेनमधून पडला होता हे उपलब्ध कागदोपत्री पुराव्यांवरून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने खानच्या पालकांना 4 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.